पुणे येथे पुन्हा एकदा ‘हिट अँड रन’ प्रकरणी दुचाकीस्वाराचा मृत्यू !
पुणे – येथे पुन्हा एकदा ‘हिट अँड रन’ची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या आलिशान चारचाकीने दुचाकीस्वार तरुणाला जोरदार धडक दिली. शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील गुगल इमारतीसमोर १० ऑक्टोबरला मध्यरात्री १ वाजता ही घटना घडली. रौफ शेख असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर गाडीचालक हा घटनास्थळावरून पसार झाला होता; मात्र पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्याला अटक केली आहे. आयुष तयाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो हडपसर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. आरोपीने मद्यपान करत चारचाकी चालवली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
आरोपी शहरातील एबीसी रोड कडून ताडी गुता चौकाकडे निघाला होता. या वेळी चारचाकीचालकाने प्रथम एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवरून ३ जण प्रवास करत होते. अपघातात त्यांना किरकोळ मार लागला. आरोपीने घटनास्थळावर न थांबता सुसाट वेगात कार पुढे नेली. त्यानंतर पुढे दुचाकीस्वार रौफ शेख यास पाठीमागून जोरदार धडक दिली. रौफ यास स्थानिकांनी तातडीने उपचारासाठी ‘नोबल हॉस्पिटल’ येथे भरती केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.