आदिमाता सीता !

नवरात्रोत्सव विशेष

माता सीता प्रभु श्रीराम यांच्या समवेत भक्तांना आशीर्वाद देतांना

भारतीय संस्कृतीत होऊन गेलेल्या महान तपस्विनींच्या गाथा नेहमीच प्रेरणादायी आणि स्फुल्लिंग चेतवणार्‍या असतात. त्या ऐकून आपल्यातील आत्मबल जागृत होऊन आपल्यालाही स्फुरण चढते. रावणवध करणार्‍या प्रभु श्रीरामाची भार्या, म्हणजेच सीतामातेचे उदाहरणही निश्चितच आदर्श आणि पातिव्रत्याच्या शक्तीचे मर्म सांगणारे आहे. सीतामातेला रावणाने पळवून अशोकवनात ठेवले, तेव्हा रावण मधे मधे विवाहासाठी तिचे मन वळण्यास येत असे. रावणाशी बोलतांना सीतामाता प्रत्येक वेळी गवताचे पाते मध्ये ठेवत असे. हे पाते तिचे मोठे संरक्षककवच अन् एखाद्या प्राणघातक शस्त्रासमानच ते होते. गवताच्या पात्यामध्ये शस्त्राची धार निर्माण करण्याची क्षमता सीतामातेच्या पातिव्रत्यात अन् तिच्या साधनेत होती. रावण मदोन्मत्त होता; तो असुरांचा राजा होता. मनात आणले असते, तर तो सीतेशी कसाही व्यवहार करू शकला असता; परंतु ते शक्य नव्हते; कारण सीतामाता साक्षात् आदिमातेचेच रूप आणि शक्ती होती !

पातिव्रत्याच्या सामर्थ्यामुळे शत्रूच्या समोर सीतेची दृष्टी क्रोधायमान होत असे; पण त्याच दृष्टीतून रावणाचा अंत होऊ नये, यासाठी रावणाकडे मान वर करून न पहाता केवळ गवताच्या पात्याकडे एकटक पहात असे. जर तिने रावणाकडे पाहिले असते, तर तिच्या क्रोधाने तो तेथेच भस्मसात् झाला असता. त्यामुळे तसे न करण्यास राजा दशरथानेच याआधीच तिला एका प्रसंगाच्या वेळी सांगितले होते. रावणाच्या लंकेत असतांना तिचा जीव जाण्याचीही शक्यता होती; पण भीतीने ती रावणाला शरण गेली नाही. त्याची वृत्ती आसुरी होती; पण सीतेमध्ये देवत्व असल्याने ‘रावणाने रामाला शरण यावे’, असेच तिला वाटत होते. या सर्वांतून सीतेमधील समर्पण, आत्मत्याग, आज्ञापालन, धैर्य हे गुण अनुकरणीय आणि आदर्श आहेत. तिने श्रीराम, लक्ष्मण यांच्या जोडीला १४ वर्षांचा वनवास भोगला. श्रीरामाने सांगितल्यामुळे तिला अग्निपरीक्षेलाही सामोरे जावे लागले. तिच्या जीवनात प्रतिकूलता अधिक होती; पण ना ती कधी डगमगली, ना तिची श्रीरामावरील श्रद्धा डळमळीत झाली ! कठीण प्रसंगांतून ती तावून सुलाखून आणि शुद्ध होऊनच बाहेर पडली. (पृथ्वीच्या गर्भात परत गेली.)

नवरात्रोत्सवात स्त्रियांनी सीतामातेचा आदर्श समोर ठेवावा. कठीण प्रसंगांचा सामना करतांना सीतेसारखे निश्चल रहावे ! वासनांधांच्या नजरांची शिकार न होता स्वतःचे पावित्र्य जपायला हवे ! निष्कलंक व्हावे ! त्यामुळे आजच्या स्त्रियांनी रावणासारख्या आसुरी प्रवृत्तींना सामोरे जाण्यासाठी आत्मबल वाढवायला हवे !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.