हिंदुद्वेष्टे ‘फॅक्ट व्हिड’ फेसबुक खाते कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश !

  • हिंदु देवता, हिंदु संस्कृती आणि राष्ट्रध्वज यांचा अवमान केल्याचे प्रकरण

  • हिंदु विधीज्ञ परिषदेच्या देहली उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचा पुढाकार !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – हिंदु देवता, हिंदु संस्कृती आणि भारताचा राष्ट्रध्वज यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी ‘फॅक्ट व्हिड’ हे फेसबुक खाते कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश केंद्रशासनाच्या ‘ग्रिव्हेन्स अपेलेट कमिटी’ (जीएसी), म्हणजेच ‘तक्रार अपील समिती’ने दिले आहेत. यासंदर्भात हिंदु विधीज्ञ परिषदेच्या देहली उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी पुढाकार घेतला होता.

‘फॅक्ट व्हिड’ या फेसबुक खात्यावरून हिंदु देवता, हिंदु संस्कृती आणि भारताचा राष्ट्रध्वज यांचा अवमान करणारे लिखाण सतत प्रसारित केले जात होते. याला अनेक धर्माभिमानी हिंदूंनी आक्षेप घेतला होता. काहींनी या खात्याच्या विरोधात फेसबुककडे तक्रारही केली होती; मात्र फेसबुकने प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी यासंदर्भात ‘तक्रार अपील समिती’ (जीएसी) कडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. ‘जीएसी’ने हे सूत्र उचलून धरले आणि फेसबुकला ‘फॅक्ट व्हिड’ हे खाते कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश दिले. अधिवक्त्या सचदेवा यांनी यासंदर्भात ‘एक्स’वरून पोस्ट करून वरील माहिती दिली.

संपादकीय भूमिका

अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचे अभिनंदन ! अशा धर्मप्रेमी अधिवक्त्याच हिंदु धर्माची खरी शक्ती होत !