Hizb-ut-Tahrir Banned : लेबनॉनमधील ‘हिजबुत-तहरीर’ या आतंकवादी संघटनेवर भारत सरकारकडून बंदी

नवी देहली – भारत सरकारने ‘हिजबुत-तहरीर’ या लेबनॉनमधील आतंकवादी संघटेवर बंदी घातली आहे. या संघटनेचे उद्दिष्‍ट पुन्‍हा एकदा मुसलमानांना एकत्र करून संपूर्ण जगभरात इस्‍लामी खिलाफत साम्राज्‍य आणि शरीयत कायदा प्रस्‍थापित करणे आहे. या संघटनेचे मुख्‍यालय लेबनॉनची राजधानी बैरूत येथे आहे. अनेक देशांनी या संघटनेवर यापूर्वीच बंदी घातली आहे. यात ब्रिटन, जर्मनी, इजिप्‍त आणि अनेक मध्‍य आशियाई आणि अरब देशांचा समावेश आहे.

१. केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रसारित केलेल्‍या अधिसूचनेत म्‍हटले आहे की, ही संघटना तरुणांना कट्टरपंथी बनवण्‍यात आणि त्‍यांना इस्‍लामिक स्‍टेटसारख्‍या आतंकवादी संघटनांमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी अन् आतंकवादी कारवायांसाठी निधी उभारण्‍यासाठी प्रेरित करण्‍यात गुंतले आहे. या संघटनेचा उद्देश लोकशाही पद्धतीने निवडून आलेली सरकारे उलथून टाकणे आणि देशातील नागरिकांना समाविष्‍ट करून भारतासह जगभरात इस्‍लामी राजवट स्‍थापित करणे आहे.

२. राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने हिजबुत-तहरीर प्रकरणात तमिळनाडूमधून एका प्रमुख आरोपीला अटक केली होती. आतापर्यंत या प्रकरणात एकूण ७ आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी फुटीरतावादाचा प्रचार करण्‍यात आणि काश्‍मीरला मुक्‍त करण्‍यासाठी पाकिस्‍तानकडून सैनिकी साहाय्‍य मिळवण्‍यात सक्रीय होते. ही संघटना विविध सामाजिक माध्‍यमे, अ‍ॅप्‍स यांचा वापर करून आणि बैठका घेऊन मुसलमान तरुणांना आतंकवादी कारवायांमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी प्रोत्‍साहित करून करत आहे.