Balochistan Coal Mine Attack : बलुचिस्तानमध्ये कोळसा खाणीवर झालेल्या आक्रमणात २० जण ठार !
क्वेटा (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील कोळशाच्या खाणीवर काही अज्ञात बंदूकधार्यांनी १० ऑक्टोबरच्या रात्री उशिरा आक्रमण केले. यात किमान २० खाण कामगार ठार झाले असून ७ जण घायाळ आहेत. प्रांतातील दुकी जिल्ह्यात बंदूकधार्यांनी खाणीजवळ रहाणार्या लोकांच्या घरांना वेढा घालून अंदाधुंद गोळीबार केला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूमुखी पडलेल्या आणि घायाळ झालेल्यांपैकी बहुतांश जण बलुचिस्तानमधील पश्तून भाषिक असून मृतांमध्ये ३ अफगाणी नागरिकांचाही समावेश आहे.
Balochistan Coal Mine Attack: 20 people killed in an attack on a coal mine in Balochistan!#Balochistan #coal #attack pic.twitter.com/aFFcrKZ8yJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 11, 2024
१. अद्याप कुणा आतंकवादी अथवा फुटीरतावादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही. पाकिस्तान सरकार तेल आणि खनिजे यांनी समृद्ध असलेल्या बलुचिस्तानची नैसर्गिक साधनसंपत्ती स्वतःच्या कह्यात घेऊन तेथील लोकांचे शोषण करत असल्याचा आरोप येथील अनेक गट करत आहेत.
२. ४ दिवसांनी पाकची राजधानी इस्लामाबादमध्ये ‘शांघाय सहकार्य संघटने’ची शिखर परिषद होत असून त्याला भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्यासह संबधित सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित रहाणार आहेत. या दृष्टीकोनातून या आक्रमणानंतर आता सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे.
३. याआधी ७ ऑक्टोबरला ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने पाकच्या सर्वांत मोठ्या विमानतळाबाहेर चिनी नागरिकांवर केलेल्या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले होते.