प्रतापगडावर ‘मशाल महोत्‍सव’ साजरा

सातारा, १० ऑक्‍टोबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या दैदीप्‍यमान पराक्रमाची साक्ष देणार्‍या प्रतापगडावर रात्री ३६५ मशाली पेटवून ‘मशाल महोत्‍सव’ साजरा करण्‍यात आला. या वेळी फटाक्‍यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर अन् ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला. राज्‍यभरातील सहस्रो शिवभक्‍तांनी हा मशाल महोत्‍सव ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला.

प्रतापगडवासिनी श्री भवानीमातेच्‍या मंदिरास ३५० वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर महोत्‍सव चालू करण्‍यात आला. तेव्‍हापासून प्रतिवर्षी नवरात्रोत्‍सवात मशाल महोत्‍सव साजरा केला जातो. यंदा या महोत्‍सवाचे १५ वे वर्षे आहे. ८ ऑक्‍टोबरच्‍या रात्री श्री भवानीमातेची विशेष पूजा आणि गोंधळ झाला. नंतर रात्री पारंपरिक वाद्यांचा गजर करून मशाली पेटवण्‍यात आल्‍या. भवानीमाता मंदिरापासून गडाच्‍या बुरुजापर्यंत पेटवण्‍यात आलेल्‍या मशालींनी गड आणि परिसर उजळून निघाला. गडाच्‍या चहूबाजूंनी करण्‍यात आलेल्‍या आकर्षक विद्युत् रोषणाईमुळे गडाचे सौंदर्य उजळून निघाले. गडावर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

अनेक वर्षांपासून प्रतापगडावर नवरात्रीत २ घट बसवले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना केल्‍यामुळे एक घट त्‍यांच्‍या नावाने, तर दुसरा घट स्‍वराज्‍याचा पाया भक्‍कम केला; म्‍हणून राजाराम महाराज यांच्‍या नावाने बसवला जातो.