पोर्शे कार अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाचे २ सदस्य बडतर्फ !
पदाच्या दुरुपयोगाचा ठपका
पुणे – येथील कल्याणीनगर परिसरात १९ मे या दिवशी ‘हिट अँड रन’ची घटना घडली होती. त्यात मद्याच्या नशेत पोर्शे कार चालवणार्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने २ तरुण अभियंत्यांना उडवले होते. त्यात दोघांचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर बाल न्याय मंडळाने या आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याचे निर्देश देऊन त्याला तात्काळ जामीन संमत केला होता. त्याचे सामाजिक माध्यमांवर तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर महिला आणि बाल विकास आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सरकारने बाल न्याय मंडळाच्या एल्.एन्. धनवडे आणि कविता थोरात या २ सदस्यांवर बडतर्फीची कारवाई केली आहे. त्यांच्यावर पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.