दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : वीजवाहिनीचा धक्‍का बसून मुलाचा मृत्‍यू !; विनापावती दंड घेणार्‍या ३ पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्‍हा नोंद

वीजवाहिनीचा धक्‍का बसून मुलाचा मृत्‍यू !

कल्‍याण – येथे रात्री मित्रांसमवेत गरबा पहाण्‍यासाठी गेलेल्‍या कमलाकर नवले (वय १५ वर्षे) याचा वीजवाहिनीचा धक्‍का बसून मृत्‍यू झाला. तो गरबा पहाण्‍यासाठी रोहित्राच्‍या एका संरक्षित भिंतीवर चढला. गरबा संपल्‍यावर भिंतीवरून उडी मारतांना तोल जाऊन तो तेथे लोंबकळत असलेल्‍या वीजवाहिनीवर पडला. तेव्‍हा विजेचा धक्‍का लागून त्‍याचा मृत्‍यू झाला.


विनापावती दंड घेणार्‍या ३ पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्‍हा नोंद

नवी मुंबई – पोलीस मुख्‍यालयात कार्यरत असतांना रस्‍त्‍यावर उभे राहून वाहनांची पडताळणी करण्‍याच्‍या नावाखाली पोलीस कर्मचारी पैसे घेत असल्‍याचे उघड झाले. पावती न देता दंडवसुली केल्‍याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. स्‍वप्‍नील देवरे, विशाल दखने आणि सचिन बोरकर अशी आरोपींची नावे आहेत. हे तिन्‍ही पोलीस कर्मचारी असून पोलीस मुख्‍यालयात कार्यरत आहेत.

संपादकीय भूमिका : अशांवर कठोर कारवाई करायला हवी !


२५ ऑक्‍टोबरपासून बेमुदत आंदोलन !

साहाय्‍यक परिचारिका प्रसविकांचा निर्णय !

मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍यांतर्गत कुटुंब कल्‍याण आणि माता बाल संगोपन विभागात कार्यरत असलेल्‍या साहाय्‍यक परिचारिका प्रसविकांना (प्रसूती करणार्‍या) कालबद्ध पदोन्‍नती लागू करण्‍यात प्रशासन दिरंगाई करत आहे. यात ४०० परिचारिकांची लाखो रुपयांची आर्थिक हानी झाली. मुंबई महानगरपालिकेने निर्णय न घेतल्‍यास २५ ऑक्‍टोबरपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी परिचारिकांनी दिली आहे.


दक्षिण मुंबईत अपुरा पाणीपुरवठा !

मुंबई – दक्षिण मुंबईत काही ठिकाणी अल्‍प दाबाने, तर काही ठिकाणी ५० टक्‍क्‍यांहून अधिक भागात पाणीच येत नाही. त्‍यामुळे स्‍थानिकांना टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. काँग्रेसने याविरोधात मुंबई महापालिकेला पत्र पाठवून निषेध व्‍यक्‍त केला आहे.


वंचित आघाडीच्‍या दुसर्‍या सूचीत १० मुसलमान उमेदवार !

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने त्‍यांची दुसरी सूची घोषित केली आहे. यामध्‍ये त्‍यांनी १० मुसलमान उमेदवारांना संधी दिली आहे. मलकापूर, बाळापूर, परभणी, औरंगाबाद (मध्‍य), गंगापूर, कल्‍याण (पश्‍चिम), हडपसर, माण, शिरोळ अशा ठिकाणांसाठी हे उमेदवार नेमण्‍यात आले आहेत.