सद्गुरु स्वाती खाडये यांच्या समवेत कोल्हापूर येथील श्री गोसावी महाराज यांच्याकडील श्री महालक्ष्मीदेवी आणि एकमुखी दत्त यांच्या मूर्तींचे दर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे
१. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत श्री महालक्ष्मी मंदिरात पुष्कळ गर्दी असल्यामुळे देवीचे प्रत्यक्ष दर्शन घेता न येणे, तेव्हा तेथील दूरदर्शनसंचाच्या पडद्यावर देवीच्या चित्राचे दर्शन घेणे आणि नामजप केल्यावर देवीचे चैतन्य अनुभवणे
‘नवरात्रोत्सवाच्या कालावधीत अष्टमीच्या दिवशी म्हणजे २२.१०.२०२३ या दिवशी सकाळी ६.३० वाजता आम्ही सद्गुरु स्वाती खाडये यांच्या समवेत कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तेथे पुष्कळ गर्दी असल्यामुळे आम्हाला देवीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यास पुष्कळ वेळ लागणार होता. त्यामुळे आम्ही मंदिराच्या बाहेरील गाभार्यात बसून दूरदर्शनसंचाच्या पडद्यावर (स्क्रीनवर) दिसणार्या देवीच्या चित्राचे दर्शन घेतले आणि प्रार्थना करून नामजप केला. त्यामुळे आम्हाला देवीचे चैतन्य अनुभवता आले.
२. श्री गोसावी महाराज यांच्याकडील श्री महालक्ष्मीदेवीच्या चैतन्यमय मूर्तीचे दर्शन घेणे
श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराच्या बाहेर आल्यावर आम्हाला एक साधक म्हणाले, ‘‘येथे जवळच श्री गोसावी महाराज यांनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीप्रमाणेच एक मूर्ती बनवून घेतली आहे. आपण तिचे दर्शन घेऊया.’’ त्यानुसार आम्ही त्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गेलो. श्री गोसावी महाराजांनी ९ दिवस मूर्तीवर कुंकूमार्चन आणि अभिषेक केल्यामुळे ती मूर्ती चैतन्याने भारित झाली होती. आम्ही सर्वांनी त्या मूर्तीचे दर्शन घेतले आणि आम्हाला प्रत्यक्ष मंदिरातील देवीचे दर्शन झाल्याचा आनंद झाला.
३. श्री गोसावी महाराज यांच्याकडील एकमुखी दत्ताच्या मूर्तीचे दर्शन होणे
आम्ही तेथील एकमुखी दत्त, यज्ञकुंड आणि श्री नवदुर्गादेवी यांचे दर्शन घेतले. तेथे मला पुष्कळ चैतन्य जाणवले. आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव अशा एकमुखी दत्ताचे जवळून दर्शन घेण्याची संधी मिळाली. श्री गोसावी महाराजांनी आम्हाला चंदनाचा लेप लावला. तेव्हा शरिरात थंडावा जाणवून मन निर्विचार अन् शांत झाले.
४. श्री गोसावी महाराज यांनी सद्गुरु स्वाती खाडये यांच्याकडून देवीला अभिषेक करवून घेणे
श्री गोसावी महाराज यांनी सद्गुरु स्वाती खाडये यांच्याकडून देवीला अभिषेक करवून घेतला. तेव्हा ‘देवीतत्त्व जागृत झाले असून साक्षात् देवी समोर उभी आहे. देवीच स्वतःची पूजा करवून घेत आहे आणि तेथे पुष्कळ चैतन्य आहे’, असे मला वाटले. तेव्हा माझे मन निर्विचार होऊन मला आनंद झाला. सद्गुरु स्वातीताई यांना
श्री महालक्ष्मीदेवीला भेटण्याची तीव्र तळमळ होती. त्यामुळे ‘संतांची इच्छा आणि संतांचे नियोजन याप्रमाणे दर्शन घडल्यामुळे आम्हाला त्याचा लाभ झाला’, याबद्दल आम्ही श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी कृतज्ञ आहोत.
संत ‘देवीची समष्टीवर कृपा व्हावी आणि तिचे आशीर्वाद सर्वांना मिळावेत’, यासाठी याग, पूजा अन् अभिषेक करून देवतांना जागृत करतात. देवतांची जागृत झालेली शक्ती साधकांच्या उद्धारासाठी वापरली जाते. त्यातून संकल्प होऊन साधकांची शीघ्र गतीने प्रगती होते’, याची अनुभूती मला वरील प्रसंगात आली.’
– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल (२७.१०.२०२३)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |