नवरात्रीत माहुरच्या श्री रेणुकादेवीच्या दर्शनाला जाण्याची इच्छा होणे आणि खोलीतील फुलपाखरामध्ये रेणुकादेवीचे दर्शन होणे

श्री रेणुकादेवीच्या मुखवट्याप्रमाणे दिसणारे फुलपाखरु

१. नवरात्रीत माहुरच्या श्री रेणुकादेवीच्या दर्शनाला जाण्याची इच्छा होणे

‘२६.९.२०२२ या दिवशी रेणुकादेवीच्या नवरात्रीत सनातन संस्थेचे संत पू. पात्रीकरकाका (वय ७२ वर्षे) आणि मी, माझ्या दातांच्या उपचारांसाठी अकोला येथे गेलो होतो. तिथे आम्ही श्रीमती भट या साधिकेच्या घरी निवासाला होतो. आमची कुलदेवता माहुरची श्री रेणुकादेवी आहे. मी देवद येथील आश्रमात सेवेला असते. या वर्षी नवरात्रीत मी विदर्भात असल्यामुळे ‘देवीच्या दर्शनाला जावे’, असा विचार माझ्या मनात आला; पण मी हा विचार पू. काकांना बोलून दाखवला नाही.

२. खोलीतील फुलपाखरामध्ये श्री रेणुकादेवीचे दर्शन होणे

पू. अशोक पात्रीकर

त्या रात्री मला पू. काका विश्रांती घेत असलेल्या खोलीतील फरशीवर एक फुलपाखरू दिसले. लहान दिवा असूनही मला त्याच्याकडे पाहिल्यावर पुष्कळ चांगले वाटले; म्हणून मी पू. काकांना उठवले आणि त्या फुलपाखराचे छायाचित्र काढायला सांगितले. खोलीत दिवा लावल्यावर मी त्या फुलपाखराकडे निरखून पाहिल्यावर मला त्याच्यात श्री रेणुकादेवीचे दर्शन झाले. पू. काकांनाही त्याच्याकडे पाहून शांत वाटले. त्यांनी छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला; पण ते उडून गेले. खोलीतील पंख्याचा त्याला धक्का लागला आणि ते जमिनीवर पडले; पण आम्ही खोलीत शोध घेतला असता, ते आम्हाला दिसले नाही. रात्री पू. काका प्रसाधनगृहात जायला उठले. तेव्हा त्यांना ते फुलपाखरू दाराजवळ दिसले. त्यांनी भ्रमणभाषने त्याचे छायाचित्र काढले.

३. मरण पावलेल्या फुलपाखराच्या छायाचित्रातून चांगली स्पंदने येणे आणि त्याच्याकडे पाहिल्यावर आनंद जाणवून शांत वाटणे

सौ. शुभांगी पात्रीकर

सकाळी ते फुलपाखरू मरण पावलेले दिसले. सकाळी त्या फुलपाखराच्या छायाचित्राकडे निरखून पाहिल्यावर मला पुन्हा श्री रेणुकादेवीचा मुखवटा दिसला. पू. काका आणि श्रीमती भटकाकूंनाही त्याच्याकडे पाहिल्यावर शांत वाटले आणि आनंद जाणवला. पू. काकांनी त्याचे छायाचित्र सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना पाठवल्यावर ‘त्यांनाही सूक्ष्मातून चांगली स्पंदने येत आहेत’, असे जाणवल्याचे त्यांनी कळवले.

४. कृतज्ञता

या माध्यमातून माझी रेणुकादेवीच्या दर्शनाची इच्छा देवीने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्ण केली. यासाठी मी पू. काका, श्री रेणुकामाता आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. शुभांगी अशोक पात्रीकर (वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.११.२०२२)


छायाचित्रातील फुलपाखरू आणि श्री बगलामुखीमातेचे चित्र यांत साम्य जाणवणे 

‘मी आणि सौ. शुभांगी पात्रीकरकाकू अमरावती येथील सेवाकेंद्रात आल्यावर सेवाकेंद्राच्या प्रवेशदारावर श्री बगलामुखीमातेच्या चित्राकडे पाहिल्यावर देवीचा मुखवटा आणि फुलपाखराचे चित्र यांत मला विलक्षण साम्य जाणवले. त्या फुलपाखराच्या माध्यमातून पात्रीकरकाकूंना श्री रेणुकादेवीचे आणि मला बगलामुखी देवीचे दर्शन झाले अन् आमचा भाव जागृत झाला.’

– (पू.) अशोक पात्रीकर (१८.११.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या व संतांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक