नवरात्रीच्या कालावधीत साधिकेला आलेल्या अनुभूती !
१. नवरात्रीमध्ये घटस्थापना केल्यावर आलेल्या अनुभूती
अ. ‘मी नवरात्रीत नऊ दिवस घरात देवीची स्थापना करते. तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा तांबडा प्रकाश देवघरात पसरतो आणि जणूकाही ‘देवीची मूर्ती आता बोलणार आहे’, असे मला वाटते. त्या वेळी मला शंखनाद ऐकू येत असतो.
आ. मला घरात पैंजणांचा आवाज ऐकू येतो.
इ. देवीला भावपूर्ण प्रार्थना केल्यावर ‘देवी प्रार्थना स्वीकारते’, असे मला जाणवते.
२. कुमारिकाभोजनाच्या वेळी आलेली अनुभूती
२ अ. देवीच्या डोळ्यांची हालचाल जाणवणे आणि ‘ती आशीर्वाद देत आहे’, असे दिसणे : नवरात्रीत अष्टमीला आमच्याकडे कुमारिकापूजन आणि भोजन असते. एकदा मी नवरात्रीतील अष्टमीला कुमारिकाभोजनाचे आयोजन केले होते. त्या वेळी आम्ही या प्रसंगाचे छायाचित्र काढले होते. मी रात्री ते छायाचित्र पहात असतांना त्यामध्ये मला देवीच्या डोळ्यांची हालचाल जाणवली आणि ‘ती मला आशीर्वाद देत आहे’, असे दिसले.
३. कुमारिका आणि सुवासिनी यांच्या भोजनाच्या वेळी सुवासिनीने साडी नेसल्यास अन् कुमारिकेने घागरा-पोलका परिधान केल्यास त्यांच्यात देवीतत्त्व जाणवते.
४. इतर अनुभूती
४ अ. श्री दुर्गादेवीला वाहिलेले फूल हातावर जोरात पडणे, तेव्हा तिच्याकडे पाहिल्यावर तिचा चेहरा हसरा दिसणे आणि त्यानंतर भान हरपणे : मी घरी देवपूजेची सिद्धता करत असतांना श्री दुर्गादेवीला वाहिलेले फूल माझ्या हातावर जोरात पडले. त्यामुळे मी एकदम आश्चर्यचकित झाले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘माझ्यावर कोणी फूल टाकले ?’ तेव्हा मी देवीकडे बघितले, तर मला तिचा हसरा चेहरा दिसला आणि माझे भान हरपले. ‘आपण भावपूर्ण सेवा केली, तर ती देवीच्या चरणी पोचते’, असे माझ्या लक्षात आले.
४ आ. लाल आणि हिरवे वस्त्र परिधान केल्यावर स्वतःत देवीतत्त्व जाणवणे : लाल आणि हिरवे वस्त्र परिधान केल्यावर माझ्या शरिराचे तापमान वाढते अन् ‘देवीतत्त्व अधिक प्रमाणात आकर्षित होत आहे’, असे मला जाणवते. जेव्हा मी लाल आणि हिरवे वस्त्र परिधान करून गरबा खेळायला जाते, तेव्हा ‘माझ्यामध्ये देवीचे तत्त्व जाणवत असते’, असे काही जणांनी मला सांगितले.’
– सौ. नीता मनोज सोलंकी, मडगाव, गोवा. (२६.७.२०२४)
|