K.T. Jaleel’s Remarks On Gold Smuggling : मलप्‍पूरम् (केरळ) येथील विमानतळावरील सोन्‍याच्‍या तस्‍करीत पकडलेले बहुतेक आरोपी मुसलमान !

  • केरळमधील सत्ताधारी पक्षातील आमदार के.टी. जलील यांचे विधान

  • मुसलमान धर्मगुरूंनी अशांना गुन्‍हेगारी कृत्‍यांपासून लांब रहाण्‍यासाठी फतवा काढून सल्ला देण्‍याचेही केले आवाहन

आमदार के.टी. जलील

थिरूवनंतपूरम् (केरळ) – ख्रिस्‍त्‍यांकडून होत असलेल्‍या काही चुकीच्‍या कृत्‍यांच्‍या  विरोधात ख्रिस्‍त्‍यांनी पुढे यावे आणि मुसलमानांकडून होणार्‍या गुन्‍ह्यांकडे मुसलमान समाजाने लक्ष दिले पाहिजे. हिंदूंनी त्‍यांच्‍या समाजातील चुकीच्‍या प्रथांकडे लक्ष दिले पाहिजे. कारीपूर (मलप्‍पूरम) आंतरराष्‍ट्रीय विमानतळाच्‍या आजूबाजूला सोन्‍याच्‍या तस्‍करीच्‍या प्रकरणात पकडले गेलेले बहुतेक लोक मुसलमान समुदायातील आहेत. मुसलमान धर्मगुरूंनी लोकांना सोन्‍याची तस्‍करी आणि हवाला (पैशांच्‍या हस्‍तांतरासाठी वापरण्‍यात येणारी प्रणाली) व्‍यवहार यांपासून दूर रहाण्‍याचा सल्ला देण्‍यासाठी फतवा काढला पाहिजे, असे विधान सत्ताधारी साम्‍यवादी लोकशाही आघाडीचे आमदार के.टी. जलील यांनी केले. यामुळे वाद झाला आहे.

१. जलील यांनी हे विधान कोळीकोड विमानतळावर पकडलेल्‍या तस्‍करांच्‍या पार्श्‍वभूमीव केले आहे. यांमधील बहुतांश तस्‍कर हे मुसलमान होते. जलील यांनी एका मौलवीवर (इस्‍लामच्‍या धार्मिक नेत्‍यावर)  सोन्‍याच्‍या तस्‍करीचा आरोप करत म्‍हटले आहे की, हज यात्रेवरून परततांना त्‍याने कुराणात लपवलेले सोने आणले होते; मात्र त्‍याचे नाव उघड केले गेले नाही.

२. जलील यांच्‍यावर इंडियन युनियन मुस्‍लिम लीगचे ज्‍येष्‍ठ नेते पी.एम्.ए. सलाम यांनी टीका करत विचारले की, जलील म्‍हणाले की, ‘मुसलमान समुदायातील लोक तस्‍करी करत आहेत.’ त्‍यांना ही माहिती कुठून मिळाली? ते हे कशाच्‍या आधारावर बोलत आहेत ? या वक्‍तव्‍यावर जलील यांनी तातडीने क्षमा मागावी.

३. आमदार अन्‍वर यांनीही जलील यांच्‍या विधानावर टीका केली आणि ते म्‍हणाले की, जर जलील यांनी असे विधान केले असेल, तर ती त्‍यांच्‍या सार्वजनिक जीवनातील सर्वांत वाईट गोष्‍ट आहे.

४. केरळमध्‍ये सोन्‍याच्‍या तस्‍करीच्‍या घटना गेल्‍या काही वर्षांत वाढल्‍या आहेत, विशेषत: मलप्‍पूरम् जिल्‍ह्यातील कोळीकोड विमानतळाच्‍या परिसरात या घटना घडत आहेत. या संदर्भात राज्‍याचे मुख्‍यमंत्री पिनराई विजयन् यांनी एका पत्रकार परिषदेत यापूर्वीच सांगितले होते की, मालप्‍पूरम् जिल्‍ह्यातून मोठ्या प्रमाणात सोने आणि हवाल्‍याच्‍या माध्‍यमांतून पैसे येत असल्‍याचे आकडेवारीवरून दिसून येते.

मी इस्‍लामच्‍या विरोधात बोललेलो नाही ! – जलील यांचे स्‍पष्‍टीकरण

जलील यांच्‍या विधानावरून वाद निर्माण झाल्‍यानंतर त्‍यांनी स्‍पष्‍टीकरण दिले आहे. जलील म्‍हणाले की, मी इस्‍लामच्‍या विरोधात काहीही बोललो नाही. सोन्‍याची तस्‍करी आणि हवाला व्‍यवहार हे धर्माच्‍या विरोधात असल्‍याची जाणीव धार्मिक नेत्‍यांनी लोकांना करून द्यावी, हाच त्‍यांचा उद्देश होता. मी म्‍हणालो की, पकडले गेलेले बहुतेक लोक मुसलमान आहेत. मी संपूर्ण समाजावर आरोप केलेले नाहीत. मुसलमान समुदायाने समजून घेतले पाहिजे की, ही कृत्‍ये धर्माच्‍या विरोधात आहेत. जनजागृतीसाठी धर्मगुरूंनी फतवा काढावा, असे मी म्‍हटले आहे. ही मागणी इस्‍लामद्वेषी नाही.

भाजप आणि काँग्रेस यांच्‍याकडून जलील यांच्‍या विधानाचा विरोध

भाजपचे नेते व्‍ही. मुरलीधरन् म्‍हणाले की, देशात गुन्‍ह्यांविरुद्ध कायदे आहेत आणि या कायद्यांचा आधार राज्‍यघटना आहे. जलील यांचे वक्‍तव्‍य राज्‍यघटनेच्‍या मूळ भावनेच्‍या विरोधात असून त्‍यांनी या प्रकरणी विचारपूर्वक बोलले पाहिजे.

काँग्रेस नेते शफी पारंबिल म्‍हणाले की, भारत लोकशाही देश आहे आणि येथे कोणतीही बेकायदेशीर कृती फतव्‍याद्वारे नव्‍हे, तर कायदेशीर मार्गाने सोडवले पाहिजे. जलील यांच्‍या वक्‍तव्‍यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून ते देशाच्‍या लोकशाही रचनेच्‍या विरोधात आहे.

जलील यांचीही झाली होती चौकशी

वर्ष २०२० मध्‍ये आमदार जलील राज्‍याचे उच्‍च शिक्षणमंत्री असतांना संयुक्‍त अरब अमिरातच्‍या वाणिज्‍य दूतावासातून तस्‍करी केल्‍याचा आरोप असलेल्‍या एका प्रकरणात सीमाशुल्‍क विभागाने त्‍यांची चौकशी केली होती. त्‍याच्‍यावर सोन्‍याच्‍या तस्‍करीचा गुन्‍हाही नोंदवण्‍यात आला होता. राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) त्‍यांना चौकशीसाठी बोलावले होते.

संपादकीय भूमिका

एक मुसलमान आमदार थेट अशा प्रकारचे विधान करतो, हे आश्‍चर्यकारकच होय ! देशात मुसलमान अल्‍पसंख्‍य असतांना गुन्‍हेगारीत मात्र ते बहुसंख्‍य असल्‍याचेच चित्र दिसत असते, हेच एकप्रकारे त्‍यांनी सांगितले आहे !