Bharat Ratna For Ratan Tata : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोक प्रस्ताव !
रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ देण्याची केंद्रशासनाला विनंती करणारा प्रस्ताव !
मुंबई, १० ऑक्टोबर (वार्ता.) – ज्येष्ठ उद्योगपती ‘पद्मविभूषण’ रतन टाटा यांना १० ऑक्टोबर या दिवशी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली वहाण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयीचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना ‘भारतरत्न’ देण्याची केंद्रशासनाकडे विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.
Maharashtra cabinet mourns Ratan Tata; urges Centre to honour Ratan Tata with Bharat Ratna!
Tributes were paid at the Cabinet Meeting
Recognizing his remarkable contributions to India’s industry & social sector, the Maharashtra Cabinet has passed a resolution to confer the… pic.twitter.com/1Yfj0Tj1w7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 10, 2024
शोक प्रस्तावात म्हटले आहे की,
१. उद्यमशीलता हा समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो; मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि समाजाप्रती प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रूपाने आपण अशा विचारांचा समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला.
२. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळतांना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रूपाने देशाचा प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे.
३. रतन टाटा हे टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून या समुहाचा कारभार अनेक वर्षे पाहिला. देशातील सर्वांत जुन्या अशा टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीने त्यांनी काम पाहिले.
४. त्यांनी नैतिक मूल्यांची जी जपणूक केली, ती इतर उद्योजक आणि उद्योगविश्वातील भावी पिढ्या यांच्यासाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतील. ते तत्त्वनिष्ठ कर्मयोगी होते.
५. स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीत टाटा समुहाचा सिंहाचा वाटा होता. या माध्यमातून रतन टाटा यांनी भारताचा झेंडा जागतिक पातळीवर दिमाखाने फडकता ठेवला.
६. विविध क्षेत्रांमध्ये रतन टाटा यांनी अनन्यसाधारण योगदान दिले.
७. मुंबईवरील आतंकवादी आक्रमणानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा स्मरणात रहाणारा आहे. कोरोना महामारी काळात रतन टाटा यांनी ‘पी.एम्. रिलीफ फंडा’ला तात्काळ १ सहस्र ५०० कोटी रुपये दिले, तसेच रुग्णांसाठी त्यांची बहुतांश उपाहारगृहे उपलब्ध करून दिली.
८. त्यांनी कधीही ‘टाटा मूल्यां’शी तडजोड केली नाही. टाटा समुहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात मंत्रीमंडळ सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला सद़्गती लाभो, ही प्रार्थना ! देशाच्या या महान सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने राज्य मंत्रीमंडळाची भावपूर्ण श्रद्धांजली !