Gaza Rebuilding Will Take Decades : आज युद्ध थांबले, तर गाझा शहर पूर्ववत् उभारायला ८० वर्षे लागणार !
गाझा शहरातील ६० टक्के इमारती नष्ट !
बैरूत (लेबनॉन)/तेल अविव (इस्रायल) – इस्रायल-हमास यांच्यातील भीषण युद्ध चालू होऊन १ वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमास या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर शेकडो रॉकेट्सद्वारे आक्रमण करून १ सहस्रांहून अधिक लोकांना मारले होते, तसेच २०० हून अधिक लोकांचे अपहरण केले होते. वर्षभर चाललेल्या युद्धामुळे गाझा उद़्ध्वस्त झाला आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या मते, गाझामधील ६० टक्के इमारती नष्ट झाल्या आहेत. तसेच आज युद्ध थांबले, तर गाझा शहर पूर्ववत् होण्यासाठी ८० वर्षे वाट पहावी लागेल, असे जागतिक बँकेचा अहवाल सांगतो.
इस्रायलने गेल्या एका वर्षात ८२५ मशिदींचे म्हणजेच गाझा पट्टीच्या ७९ टक्के मशिदींची हानी केली आहे. त्यांपैकी ६११ मशिदी पूर्णपणे उद़्ध्वस्त झाल्या आहेत.
इस्रायलने हमासचा नायनाट करण्यासाठी केलेले प्रयत्न !
१. एकेकाळी लाखो लोकांची वस्ती असलेले गाझापट्टीतील खान युनूस, गाझा आणि जबलिया या शहरांना प्रामुख्याने लक्ष्य केले.
२. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार गाझा पट्टीमध्ये युद्ध चालू झाल्यानंतर जून २०२४ पर्यंत ३ कोटी ९० लाख टन ढिगारा निर्माण झाला. यात वाळू, स्फोट न झालेले बाँब, अन्य घातक पदार्थ, तसेच मानवी अवशेष यांचाही समावेश आहे.
३. पिके आणि शेतजमिनी उद़्ध्वस्त झाल्यामुळे उपासमारीचे संकट निर्माण झाले असून लक्षावधी लोकांना त्याचा फटका बसला आहे.
खान युनिस शहराची स्थिती !
येथील ५४ टक्के इमारती उद़्ध्वस्त झाल्या असून हे शहर गाझाच्या दक्षिणेला असलेले शेकडो वर्षे जुने शहर आहे. ‘शहर भूतांचे शहर बनले आहे’, असे स्थानिक लोक म्हणतात. इस्रायली तोफखान्याने रुग्णालये, मशिदी आणि शाळा मोडकळीस आल्या आहेत. हमासच्या आतंकवाद्यांना नष्ट करण्यासाठी अशी आक्रमणे आवश्यक असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.
गाझा शहराचा विनाश !
गाझा शहर हे गाझा पट्टीची राजधानी ! भूमध्य समुद्राच्या किनार्यावर वसलेल्या या शहरात अनुमाने २० लाख लोकसंख्या असून हे जगातील सर्वांत दाट लोकवस्तीचे क्षेत्र आहे. इस्रायलने शहरातील सर्वांत जुनी मशीद, म्हणजेच ‘अल्-ओमारी मशीद’ नष्ट केली. मूळचे हे पाचव्या शतकात रोमन मंदिर होते. त्याच्या अवशेषांवर ख्रिस्त्यांचे एक ‘बायझंटाईन चर्च’ बांधले गेले. सातव्या शतकात तिचे मशिदीत रूपांतर झाले. ही मशीद हमासचे महत्त्वपूर्ण स्थान असल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला होता. आज या मशिदीची एकच भिंत उभी आहे. अल्शिफा रुग्णालय हे गाझामधील सर्वांत मोठे रुग्णालय ! इस्रायली सैन्याने एप्रिल २०२४ मध्ये या रुग्णालयावर धाड घालून त्याची बरीच हानी केली होती. या रुग्णालयात हमासचे आतंकवादी लपले असल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे.
जबलिया शहरातील ८१ टक्के इमारती उद़्ध्वस्त !
जबलिया गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागात आहे. वर्ष १९४८ मध्ये अरब-इस्रायल युद्धानंतर लाखो पॅलेस्टिनींना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले. तेव्हा हे शहर निर्वासितांसाठी स्थायिक झाले. ‘अल-ट्रान्स स्क्वेअर’ हे एकेकाळी शहराच्या सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू होता. त्याला जबलियाचे हृदय म्हटले जात असे. इस्रायलच्या आक्रमणात ते पूर्णपणे उद़्ध्वस्त झाले आहे.
हिजबुल्लाची प्रथमच इस्रायलकडे युद्धविरामाची मागणी !आतंकवादी संघटना हिजबुल्लाने प्रथमच इस्रायलकडे युद्धविरामाची मागणी केली आहे. सी.एन्.एन्.च्या वृत्तानुसार या संघटनेने प्रथमच जाहीरपणे युद्धविरामाला पाठिंबा देत गाझामधील युद्ध थांबवण्याची कोणतीही अट ठेवलेली नाही. हिजबुल्लाचा हमासला पाठिंबा असून गेल्या वर्षी ८ ऑक्टोबरला हिजबुल्लाने इस्रायलवर हवाई आक्रमण केले होते. या घटनेला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हिजबुल्लाचे उपप्रमुख नईम कासिम यांनी वरील मागणी केली. कासिम म्हणाला की, हिजबुल्ला लेबनॉनच्या संसदेचे अध्यक्ष नबीह बेरी यांनी युद्धविरामासाठी केलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देतो. एकदा युद्धविराम झाले की, इतर गोष्टींवर चर्चा होईल. |
संपादकीय भूमिकाजिहादी आतंकवाद कसा संपवायचा, याचा आदर्श वस्तूपाठ म्हणजे इस्रायली संघर्ष ! |