Ratan Tata Passed Away : उद्योगमहर्षि पद्मविभूषण रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन !

कै.पद्मविभूषण रतन टाटा

मुंबई – देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबरला रात्री ११.३० वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांना उपचारासाठी ‘इंटेसिव्ह केअर युनिट’मध्ये ठेवण्यात आले होते.

रतन टाटा यांच्या निधनाने एक सुप्रसिद्ध उद्योगपतीसह एक चांगले व्यक्तीमत्त्व हरपल्याचे दुःख समाजातील सर्व स्तरांवरून व्यक्त केले जात आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात १० ऑक्टोबर हा दिवस एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे.

सौजन्य: TOI

रतन टाटा यांचे पार्थिव कुलाबा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. अंत्यदर्शनासाठी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईमधील ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ (एन्.सी.पी.ए.) येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ४ नंतर पारशी पंथाच्या परंपरेनुसार यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. रतन टाटा यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांनीही १० ऑक्टोबर या दुखवटा दिवस घोषित केला आहे.

टाटा उद्योगसमुहाचे अध्यक्ष एन्. चंद्रशेखर यांनी रतन टाटा यांच्या निधनाचे अधिकृत वृत्त घोषित केले.