सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘राजमातंगी यागा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘२३.१०.२०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘राजमातंगी यागा’चे आयोजन करण्यात आले होते. या यागाचे देवाने माझ्याकडून करून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
१. यागाला आरंभ होताच यज्ञवेदीच्या आतील भागात चार दिशांना चार पुरुष देव सूक्ष्मातून उपस्थित होते. त्यांची मुखे चार दिशांना होती.
२. याग चालू असतांना यज्ञकुंडातून देवतांची असंख्य त्रिशुळे, गदा आणि बाण सर्व दिशांना प्रक्षेपित होत होते. दिवाळीच्या वेळी फटाक्याचे ‘रॉकेट’ आकाशात सुटतांना जसा आवाज ऐकू येतो, तसा नाद देवतांची शस्त्रे यज्ञकुंडातून सुटल्यावर मला सूक्ष्मातून ऐकू येत होता.
३. यज्ञकुंडात हिरव्या रंगाच्या दैवी कणांची निर्मिती वेगाने होत होती; परंतु वातावरणात ते संथ गतीने प्रक्षेपित होत होते.
४. यज्ञकुंडाच्या वर मला एका देवीचे ६ फूट उंचीचे त्रिशूळ दिसले. ‘यागाद्वारे वातावरणातील देवीतत्त्वात वाढ झाली आहे’, याचे ते निर्देशक होते.
५. यागाच्या परिसरात ईश्वराचे मोठे संरक्षककवच गोल आकारात निर्माण झाले होते. त्यामुळे यागात अनिष्ट शक्तींमुळे कुठलीही विघ्ने येत नव्हती.
६. साधक मंत्रोच्चार करत असतांना मंत्रातील प्रत्येक शब्दाच्या आकाराप्रमाणे दिसणारा पांढर्या रंगाचा आकार सूक्ष्मातून वातावरणात निर्माण होत होता.
७. यज्ञकुंडातून पांढर्या रंगाचे असंख्य दैवी कण निर्माण झाले. यापूर्वी झालेल्या यागांमध्ये विविध रंगांच्या दैवी कणांची निर्मिती होत होती. आज प्रथमच पांढर्या रंगाच्या असंख्य दैवी कणांची निर्मिती झालेली मला दिसली.
८. याग चालू असतांना एकदा मला अकस्मात् यज्ञकुंडातून वाघाच्या डरकाळीचा आवाज सूक्ष्मातून ऐकू आला. ‘तो वाघ देवीचा आहे’, असे मला जाणवले.
९. एकदा स्वर्गलोकातील काही देवतांनी यज्ञकुंडात गुलाबी रंगाच्या दैवी पुष्पांचा वर्षाव केला. तेव्हा ‘त्या फुलांद्वारे देवता आशीर्वाद देतात आणि त्यांची प्रसन्नता व्यक्त करतात’, असे मला जाणवले.
१०. ‘हीना’ अत्तराच्या आहुतीमुळे यज्ञकुंडातून हिरव्या रंगाच्या तेजस्वी दैवी कणांची निर्मिती झाली.
११. लघुपूर्णाहुतीच्या वेळी मला यज्ञवेदीच्या चारही कोपर्यांत सूक्ष्मातून ४ कमळे उमलतांना दिसली. त्यानंतर ‘यज्ञकुंडाच्या मध्यभागातून अग्निनारायण वर आला आणि त्याने आहुती स्वीकारली’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१०.२०२३)
|