महिला अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी !
निर्जन स्थळी पोलीस चौक्या अद्ययावत् कराव्यात ! – नीलम गोर्हे यांचे पोलिसांना निर्देश
पुणे – शहरात, तसेच निर्जन स्थळी महिलांवरील होणार्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता पोलिसांनी गस्त वाढवावी, निर्जन स्थळी असलेल्या पोलीस चौक्या अद्ययावत् कराव्यात, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी पोलिसांना दिले. पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते.
डॉ. नीलम गोर्हे पुढे म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून ही गोष्ट चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपींना पकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. निर्जन स्थळी नागरिकांच्या संरक्षणासाठी गस्त वाढवावी. तात्काळ पैसा कमावण्याच्या मोहामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे, यावर वचक ठेवणे आवश्यक आहे. घरातील व्यक्तींकडूनच महिलांवर तसेच मुलींवर अत्याचार होत आहेत. अशावेळी नातेवाईकांनी पुढे येऊन पोलिसात तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पोलिसांनी गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईची प्रसिद्धी होणेही आवश्यक असल्यामुळे समाजातील नागरिकांचा कायद्यावरील विश्वास वाढेल. पुणे शहर आणि परिसरातील गुन्हेगारी अल्प होण्यासाठी, तसेच महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोलीस विभागाने सदैव तत्पर रहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
संपादकीय भूमिकाअसे आदेश का द्यावे लागतात ? पोलिसांना स्वतःहून हे लक्षात येत नाही का ? |