कोलवाळ कारागृहात बंदीवानाकडून आत्महत्येचा प्रयत्न

कारागृहातील बंदीवानांकडून होणार्‍या सतावणुकीला कंटाळून पाऊल उचलल्याची चर्चा

म्हापसा, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात ९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी राजू दास या बंदीवानाने स्पिरीट पिऊन आणि स्वत:ला आग लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आगीची झळ लागल्याने तो ५० टक्के होरपळला आहे आणि त्याला उपचारार्थ गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. कारागृहात इतर बंदीवानांकडून होणार्‍या सतावणुकीमुळे त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा बंदीवानांमध्ये आहे.

कारागृहातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंदीवान राजू दास याची तेथील चिकित्सालयात काम करण्यासाठी नेमणूक झाली होती. त्याने अनेकदा ‘हे काम नको’, असे कारागृह अधिकार्‍यांना सांगितले होते; मात्र त्याचे कुणीही ऐकत नव्हते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन ढळले होते. ९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी बंदीवानांची वैद्यकीय तपासणी चालू होती. या वेळी त्याने बाजूला असलेल्या एका खोलीत जाऊन आतून दार बंद करून घेतले. त्यानंतर तेथे असलेले स्पिरीट घेऊन स्वत:ला पेटवले. या घटनेत तो होरपळल्याने  बेशुद्ध पडला. या घटनेची माहिती मिळताच दार तोडून त्याला बाहेर काढण्यात आले. त्याला प्रारंभी म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात आणि नंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भरती करण्यात आले.