दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : एस्.टी. बस ५० फूट दरीत कोसळली !; जामिनासाठी लाच घेणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अटकेत !
एस्.टी. बस ५० फूट दरीत कोसळली !
रायगड – माणगावच्या गोरेगावमध्ये एस्.टी. बस ५० फूट खोल दरीत कोसळली. यात ८ महिला घायाळ झाल्या आहेत. एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. महिलांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी महिलांना या बसमधून नेले जात होते’, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.
जामिनासाठी लाच घेणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अटकेत !
मुंबई – जामीन मिळवून देण्यास साहाय्य करण्यासाठी साडेतीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सतीश कदम यांनी तक्रारदारांकडे प्रथम १४ लाख रुपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा ५ लाखांची मागणी केली होती. या वेळी लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने तक्रार प्रविष्ट केली. या वेळी साडेतीन लाख रुपये स्वीकारतांना कदम यांना अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिका : पोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार !
दागिन्यांच्या लुटीसाठी शिक्षिकेची हत्या !
पनवेल – तालुक्यातील वलप या गावात सायंकाळी साडेसात वाजता खासगी शिकवणीहून घरी येतांना शिक्षिकेचा गळा दाबून खून करण्यात आला. या वेळी चोरट्यांनी तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले. दागिन्यांचे मूल्य १ लाख ९५ सहस्र रुपये आहे. शिक्षिका घरी परत न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली. तेव्हा त्यांचे प्रेत गवतामध्ये सापडले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महिलांना छेडणारे ३ धर्मांध अटकेत !
डोंबिवली – येथे भंगाराचा व्यवसाय करणारे ४ धर्मांध रस्त्यावरून जाणार्या महिलांची प्रतिदिन छेड काढत होते. या प्रकरणी महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी चौघांवर गुन्हे नोंदवून तिघांना अटक केली आहे. रूस्तम आदिल खान (वय ४० वर्षे), अश्रफ अब्दुल हमीद खान (वय २८ वर्षे), इस्तिखार अब्दुल हमीद खान (वय २१ वर्षे), अब्दुल करीम हमीद खान (वय २८ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. अश्रफ खान पळून गेला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या विक्रेत्यांची दुकाने बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे.
संपादकीय भूमिका : अशांना कठोर शिक्षाच हवी !