आज्ञाधारकपणा आणि सेवाभावी वृत्ती असलेले श्री. अतुल पवार (वय ४१ वर्षे) !
आश्विन शुक्ल सप्तमी (१०.१०.२०२४) या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे श्री. अतुल पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७३ वर्षे) यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहे.
श्री. अतुल पवार यांना ४१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
‘श्री. अतुल पवार हे वर्ष २००० मध्ये मिरज आश्रमात सेवा करत होते. वर्ष २००३ पासून ते पूर्णवेळ साधना करू लागले. त्यानंतर ते वर्ष २००७ मध्ये देवद आश्रमात सेवेसाठी आले. त्यांनी तेथील सर्व प्रकारच्या सेवा दायित्व घेऊन मनापासून आणि अत्यंत कौशल्यपूर्ण रितीने केल्या आहेत.
१. नम्रता
श्री. अतुलदादा यांचे बोलणे पुष्कळ नम्र आणि मृदू असते. मी त्यांना कधीच मोठ्या आवाजात बोलतांना पाहिले नाही.
२. अतुलदादा नेहमी साधनेविषयीच बोलत असतात.
३. त्यागी वृत्ती
वर्ष २०१० मध्ये त्यांचा विवाह कु. अश्विनी साळुंखे (आताच्या पू. (सौ.) अश्विनी पवार) यांच्याशी झाला; पण विवाहानंतर मासाभरातच पू. (सौ.) अश्विनीताईंना रामनाथी येथे गुरुकुलामध्ये सेवेसाठी जावे लागले. त्या रामनाथीला गेल्यावर मी अतुलदादांना विचारले, ‘‘दादा, तुम्ही सौ. अश्विनीताईंना रामनाथीला जाण्याची आनंदाने अनुमती दिली. त्या वेळी तुमच्या मनाची प्रक्रिया काय झाली ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (प.पू. डॉक्टर) यांनी तिला बोलावले. त्यामुळे तिची साधना होणार आहे आणि तिची प्रगतीही होणार आहे. मी तिच्या साधनेमध्ये अडथळा आणणार नाही. मी इथे राहून सेवा करीन.’’ मला त्यांचे हे बोलणे ऐकून त्यांनी केलेला त्याग कौतुकास्पद वाटला. ‘सर्वसामान्य माणसे मायेत अडकतात; पण गुरुदेव साधकांना मायेत न अडकवता साधनेत पुढे नेतात’, याचे हे उत्तम उदाहरण आहे. वयाच्या २७ व्या वर्षी पू. (सौ.) अश्विनीताई संतपदाला पोचल्या.
४. प.पू. पांडे महाराज आणि प.पू. योगतज्ञ दादाजी यांची सेवाभावी वृत्तीने सेवा करणे
वर्ष २०११ ते २०१२ ही २ वर्षे प.पू. पांडे महाराज देवद आश्रमात वास्तव्यास असतांना अतुलदादा प.पू. पांडे महाराज यांच्या सेवेत होते. वर्ष २०१४ पासून अतुलदादा योगतज्ञ दादाजी यांची सेवा करण्यासाठी नाशिकला गेले. अतुलदादा वर्ष २०१४ ते २०१९ पर्यंत म्हणजे योगतज्ञ दादाजी देहत्याग करीपर्यंत त्यांच्या सेवेत होते. त्यांची सर्व प्रकारची सेवा आज्ञाधारकपणे करून ते त्यांच्या कौतुकास पात्र ठरले. ते आदर्श साधक आणि शिष्य आहेत.
५. योगतज्ञ दादाजी यांच्या संदर्भातील सूत्रे वेळोवेळी लिहून ठेवल्याने पुढे ग्रंथांसाठी त्याचा लाभ होणे
या काळात अतुलदादा योगतज्ञ दादाजींनी सांगितलेले आध्यात्मिक लिखाण, त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे वेळोवेळी लिहून ठेवायचे. अतुलदादांच्या या प्रयत्नांमुळे योगतज्ञ दादाजींवरील ग्रंथ प्रकाशित होऊ शकले. योगतज्ञ दादाजींवरील या ग्रंथांच्या प्रकाशनामध्ये अतुलदादांचा मोठा वाटा आहे.
६. देवद आश्रमात विविध सेवा करणे
वर्ष २०१९ – २०२० पासून अतुलदादा देवद आश्रमात निवासाला आले. येथे त्यांची प.पू. दादाजींच्या संदर्भातील लिखाणाचे सुसूत्रीकरण आणि ग्रंथनिर्मिती यांची सेवा चालू असते. या व्यतिरिक्त देवद आश्रमातील अनेक सेवांमध्ये त्यांचा सहभाग असतो. आवश्यकता असल्यास ते वाहनांचे चालक म्हणूनही सेवा करतात. ते नेहमी सेवकभावात असतात. ‘त्यांच्यामध्ये अहं अल्प आहे’, असे मला वाटते.
७. संतांच्या सत्संगाचा लाभ करून घेणे
त्यांची पत्नी पू. (सौ.) अश्विनीताई यांच्याकडे ते ‘संत’ म्हणून आदरयुक्त भावाने बघतात. त्यांना मिळालेल्या परात्पर गुरु पांडे महाराज आणि योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या सत्संगाचा त्यांनी साधनेसाठी लाभ करून घेतला आहे.
‘अतुलदादांमधील नम्रता, आज्ञापालन, सेवाभाव आणि संतांवरील अतूट श्रद्धा हे गुण आमच्यामध्ये येऊ देत आणि दादांची आध्यात्मिक प्रगती जलद होऊ दे’, अशी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !’
– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.९.२०२४)