पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) यांच्या संदर्भात सुश्री (कु.) कल्याणी गांगण यांना जाणवलेली सूत्रे
‘जून २०२४ मध्ये मला मरणोन्मुख पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींची (सनातनच्या ४८ व्या संत) सेवा करण्याची संधी मिळाली. त्या निमित्ताने त्यांच्या खोलीत सेवेला गेल्यावर मला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती पुढे देत आहे.
१. पू. दातेआजींच्या खोलीत गेल्यावर तेथे ‘सात्त्विक जिवांची पुष्कळ दाटी असून ‘स्वतः एका वेगळ्याच लोकात आहे’, असे जाणवणे
जून मासात मला उत्तरदायी साधिकेने सांगितले, ‘‘तुला उद्यापासून पू. दातेआजींची सेवा करायची आहे.’’ हे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. दुसर्या दिवशी मी पू. दातेआजींच्या खोलीत पहिल्यांदाच गेले. तेव्हा मला जाणवले, ‘त्यांच्या खोलीत सात्त्विक जिवांची पुष्कळ दाटी आहे आणि मी एका वेगळ्याच लोकात आहे.’ त्यांच्या खोलीतील असे वातावरण काही दिवस होते.
२. प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजपादी उपाय चालू झाल्यावर पू. आजींनी हळूहळू हाता-पायाची हालचाल करणे
काही दिवसांनी पू. आजींसाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजपादी उपाय चालू झाले. त्यानंतर ‘पू. आजींच्या स्थितीत पालट होत आहेत’, असे माझ्या लक्षात आले. मी पहिल्या दिवशी त्यांच्या खोलीत सेवेला गेले होते. तेव्हा त्यांनी एकदा डोळे उघडले होते. काही दिवसांनी त्यांनी स्वतःचा पाय हलवला आणि हळूहळू हात हलवायलाही आरंभ केला.
३. पू. आजींच्या खोलीतील वातावरणात पालट होऊन ‘आधी निर्गुण आणि नंतर सगुण चैतन्य कार्यरत आहे’, असे लक्षात येणे
नंतर १५ दिवसांनी मला जाणवले की, ‘पू. आजींच्या खोलीतील वातावरणातही पालट होत आहे. आधी त्यांच्या खोलीत ‘निर्गुण चैतन्य अधिक प्रमाणात कार्यरत आहे’, असे मला जाणवत होते. ‘आता त्या खोलीत सगुण चैतन्य कार्यरत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
४. पू. दातेआजींच्या खोलीत सेवेला गेल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. खोलीचे दार उघडल्यावर ‘आपण जनलोकात आहोत’, असे मला जाणवते आणि माझे मन शांत होते.
आ. पू. आजींच्या शरिराला गोडसर सुगंध येतो. त्यांची सेवा पूर्ण करून मी माझ्या खोलीत गेल्यावर माझ्या अंगालाही तो सुगंध येत असतो. त्या सुगंधाची आठवण कुठेही काढली, तरी तिथे तो सुगंध येतो.
५. पू. दातेआजींचे कुटुंबीय त्यांची सेवा मनोभावे करत असल्याने सासू आणि सून यांचे नाते ‘गुरु-शिष्य’ नात्याप्रमाणे झाले आहे’, असे लक्षात येणे
पू. दातेआजींचे कुटुंबीय त्यांची सेवा मनोभावे करतात. त्यांची सून सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे) आणि सौ. नेहा दाते प्रतिदिन त्यांच्या ठरलेल्या वेळांत त्यांची सर्व शुश्रूषा करतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांची सेवा चालू असते; मात्र त्यांच्या चेहर्यावर थकवा जाणवत नाही. ‘कलियुगात ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ केल्यामुळे सासू आणि सून यांचे हे नाते गुरु-शिष्य या नात्याप्रमाणेच झाले आहे’, असे माझ्या लक्षात आले.
६. ‘पू. दातेआजी देहत्याग करतील’, असा विचार मनात येताच ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांचा मृत्यूयोग टाळतील’, असाही विचार येणे
७.६.२०२४ या दिवशी पू. आजींना अर्धांगवायूचा (‘पॅरॅलिसिस’चा) झटका आला. त्या दिवशी मी त्यांच्या खोलीसमोरून जात होते. त्या वेळी संतांचा देहत्याग झाल्यावर जसे शांत वातावरण असते, तसे वातावरण मला त्यांच्या खोलीबाहेर जाणवत होते. मी सौ. ज्योती दातेकाकूंना विचारले, ‘‘पू. आजी कशा आहेत ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘त्यांची स्थिती पुष्कळ गंभीर आहे.’’ तेव्हा ‘पू. आजींचा देहत्याग होणार’, असा विचार माझ्या मनात आला आणि त्यानंतर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले तो मृत्यूयोग टाळतील’, असाही विचार आला.
७. पू. दातेआजींची सेवा करू लागल्यावर निद्रानाश आणि पायदुखी हे त्रास उणावणे
१५.६.२०२४ या दिवशी रात्री १०.३० वाजता मी पू. दातेआजींची सेवा करायला आरंभ केला. त्या आधी १५ दिवसांपासून मला रात्री झोप लागत नव्हती. माझे पाय पुष्कळ दुखायचे आणि अनिष्ट शक्तींचा त्रासही व्हायचा. त्यासाठी काही उपाय केले, तरी माझा त्रास उणावत नव्हता. त्यामुळे मी रात्रभर तळमळत असायचे. मला एवढे दिवस असा त्रास कधी झाला नव्हता. मी पू. दातेआजींची सेवा करू लागले आणि मला होणारा त्रास पूर्णपणे उणावला.
पू. निर्मला दातेआजी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला हे अनुभवायला दिले’, याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२४)
|