महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात ‘संगीत’ विषयाची सेवा करणार्या सौ. भक्ती कुलकर्णी यांना गीतांचे विविध प्रकार ऐकून जाणवलेली सूत्रे
‘संगीत’ विषयांतर्गत विविध गीतांच्या विभागणीची (‘सॉर्टिंग’ची) सेवा करतांना मला विविध भावगीते, हिंदी चित्रपटगीते आणि भक्तीगीते ऐकावी लागतात. हे विविध गीतप्रकार ऐकतांना मला जाणवलेली सूत्रे आणि त्याविषयीचा अभ्यास येथे दिला आहे.
१. हिंदी चित्रपटगीते
अ. ही गीते ऐकतांना मला ‘चित्रपटातील गाणी परत परत ऐकावीत’, असे वाटत होते. यातून ‘मला त्रास देणार्या अनिष्ट शक्तीला काळी (त्रासदायक) शक्ती मिळत आहे आणि त्यामुळे अनिष्ट शक्ती मला ती गाणी परत परत ऐकायचा विचार घालत आहे’, असे माझ्या लक्षात आले. (साधिकेला अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असल्यामुळे साधिका रज-तमप्रधान हिंदी गीतांकडे अधिक आकृष्ट झाली. – संकलक)
आ. ‘स्वतःवर त्रासदायक शक्तीचे आवरण आले आहे’, असे मला जाणवले.
२. भावगीते
अ. भावगीते ऐकल्यावर काही कालावधीनंतर ती भावगीते माझ्याकडून पुनःपुन्हा गुणगुणली जात होती.
आ. भावगीते ऐकल्यावर थोड्या वेळाने ‘माझ्या मनात अनावश्यक विचारांचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे’, असे मला जाणवले.
इ. भावगीतातील ओळींनुसार माझ्या डोळ्यांसमोर तशीच दृश्ये दिसून तेच तेच विचार माझ्या मनात सतत येत होते.
ई. माझे डोके जड होऊन ‘माझ्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण आले आहे’, असे मला जाणवले.
(यावरून ‘भावगीत’ हे खर्या अर्थाने ‘भावनागीत आहे’, असे लक्षात येते. भाव देवाजवळ नेतो, तर भावना व्यक्तीला मायेच्या विचारांत गुरफटवतात. त्यामुळे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणतात, ‘‘भावगीताला ‘भावनागीते’ म्हणणेच योग्य आहे.’’ – संकलक)
३. भक्तीगीते
अ. भक्तीगीते ऐकतांना माझ्या मनाला चांगले वाटत होते.
आ. विविध देवतांची भक्तीगीते ऐकतांना त्या त्या देवतेची आठवण येत होती. त्या देवतेचे चित्र किंवा मूर्ती डोळ्यांसमोर येत होती.
इ. भक्तीगीते ऐकतांना माझी भावजागृतीही होत होती.’
– सौ. भक्ती विश्वनाथ कुलकर्णी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१.१०.२०२४)
संगीतातून साधना करणार्या साधकांनी संगीतातील आपला प्रवास रज-तमात्मक गीतांकडून सत्त्वगुणाधिष्ठित गीतांकडे होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
‘संगीताच्या माध्यमातून साधना करत असतांना व्यक्तीचा प्रवास रज-तम स्पंदनांकडून सत्त्वगुणी स्पंदनांकडे होत असतो. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ‘लाईक ॲटॅ्रक्ट्स लाईक’ (‘Like attracts Like’) म्हणजे ‘एकसारखी स्पंदने असलेले एकमेकांकडे अधिक आकृष्ट होतात.’ त्याप्रमाणे तम-रज गुणांचे प्राबल्य अधिक असणार्या व्यक्तीला हिंदी चित्रपटगीते अधिक भावतात, तर रज-तम गुण किंवा रजोगुण अधिक असणारे भाव(ना) गीतांमध्ये रममाण होतांना दिसतात. सत्त्वगुणी व्यक्तींचा भक्तीगीते म्हणणे किंवा ऐकणे यांकडे अधिक ओढा असतो.
या दृष्टीने संगीत ऐकणार्यांनी आणि संगीत गाणार्यांनी वरीलप्रमाणे अभ्यास करून ‘आपली आवड कशात अधिक आहे ?’ याचा अभ्यास करावा. संगीतातून साधना करतांना साधकांनी ‘संगीतातील आपला प्रवास आवडीच्या रज-तम स्पंदने असलेल्या गीतांकडून सत्त्वगुणाधिष्ठित गीतांकडे कसा करता येईल ?’, यासाठी प्रयत्नशील रहाणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे संगीतातून साधना करण्याची दिशा देण्यासाठीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय स्थापित केले आहे.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.१०.२०२४)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |