हिंदुत्वाचा राजधर्म हाच मूलमंत्र धार्मिक हिंसाचाराच्या वैश्विक समस्येवरील उपाय ! – अविनाश धर्माधिकारी, चाणक्य मंडल परिवार
मिरज, (जिल्हा सांगली), ९ ऑक्टोबर (वार्ता.) – सहिष्णुता आणि विश्वबंधुत्व यांच्या पायावर उभा असलेला ‘हिंदुत्वाचा राजधर्म’ (सहिष्णु राज्यव्यवस्था) हाच सध्याच्या धार्मिक हिंसाचाराच्या वैश्विक समस्येवरील खराखुरा उपाय जगाला तारणहार ठरेल, असे मार्गदर्शन ‘चाणक्य मंडल परिवारा’चे संस्थापक आणि माजी प्रशासकीय अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी येथे केले. येथील बालगंधर्व नाट्यगृह येथे ८ ऑक्टोबर या दिवशी ‘हिंदुत्वाचा राजधर्म’ या विषयावर ते बोलत होते.
श्री. अविनाश धर्माधिकारी पुढे म्हणाले की,
१. ‘नमस्ते’ ही प्रार्थना, तसेच ‘सर्वकल्याणकारी विचारधारा’ हा हिंदु धर्माचा पाया एकमेवाद्वितीय आहे. अरब आणि पाश्चिमात्य राष्ट्रे यांमध्ये सध्या प्रचलित असलेला ‘एकेश्वरवादावर आधारित धार्मिक हिंसाचार’ जगाला तिसर्या महायुद्धाच्या दिशेने घेऊन चालला आहे.
२. इस्रायल, अरब राष्ट्रे आणि उर्वरित जगात चालू असलेला हिंसाचार अन् विनाश टाळण्यासाठी हिंदुत्वाचा राजधर्म आज जगाला आवश्यक आहे.
३. ‘ॐ सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः…’, या प्रार्थनेतील विश्वबंधुत्व आणि विश्वकल्याणकारी सहिष्णुता हा आपल्या हिंदु धर्माचा पाया आहे.
४. राजाने आपल्या प्रजेचे आपल्या मुलाबाळांप्रमाणे रक्षण करावे, तसेच राज्यातील प्रत्येकाला त्याच्या मार्गानुसार ‘देवधर्म, साधना करण्याचा अधिकार देण्याचा राजधर्म’ हिंदु धर्माने राजाला सांगितला आहे.
५. राजाने स्वतःचे हित न पहाता ‘प्रजेचे हित म्हणजेच राजाचे हित’, हा मूलमंत्र यामध्ये सांगितला आहे. लोककल्याणकारी राज्य चालवण्यासाठी हिंदुत्वाचा राजधर्म अर्थात् सहिष्णु राज्यव्यवस्था ही अखंड विश्वाला आज उपयोगी आहे.
६. केवळ राजाने स्वीकारलेला एकच देव आणि धर्मसंस्था ही सर्वांनीच एकेश्वरवादावर आधारित स्वीकार करण्याची असहिष्णू राज्यव्यवस्था ही आज तिसर्या महायुद्धाकडे घेऊन चाललेली जागतिक समस्या आहे.
७. मूर्तीपूजकांचा म्हणजेच हिंदु धर्माच्या अनुयायांचा केला जाणारा द्वेष हा याच विचारांतून निर्माण झाला आहे.
८. भारताच्या इतिहासात ‘देवधर्म आणि पूजापद्धत यांचे स्वातंत्र्य’ यांमुळेच येथे कधीही राजकीय आणि धार्मिक हिंसाचार झालाच नाही.
९. पाश्चात्त्य लोकशाहीतील तथाकथित सर्वधर्मसमभाव (सेक्युलॅरिझम) हा वरकरणी असून एकेश्वरवादावर आधारित पंथांध हिंसाचार यांमुळेच निर्माण झाला आहे.
१०. भारतीय संस्कृतीत मुळातच सहिष्णुता आणि धार्मिक स्वातंत्र्य असल्याने युगायुगांपासूनच भारतात खरी लोकशाही नांदते.