‘जोहार’ स्मरा !
नवरात्रोत्सव विशेष
दुर्गादेवीने प्रतिपदेपासून नवमीपर्यंत ९ दिवस महिषासुराशी युद्ध केले आणि शेवटी नवमीच्या रात्री त्याचा वध केला. तेव्हापासून तिला महिषासुराचा नायनाट करणारी ‘देवी महिषासुरमर्दिनी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘वाईटावर चांगल्याने मिळवलेल्या विजयाचा’ हा उत्सव ! स्त्रीला दुर्गामातेचा अंश मानले जाते. दुर्गादेवीमध्ये असलेली सर्व गुणवैशिष्ट्ये, उदाहरणार्थ तिची क्षात्रवृत्ती, तम म्हणजे वाईट नष्ट करण्याची अंगभूत कला, तिच्या ठायी भक्तांप्रती असलेले वात्सल्य थोड्याअंशी प्रत्येकच स्त्रीमध्ये सामावलेले असते. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चित्तोडची राणी पद्मावती !
अल्लाउद्दीन खिलजी देहलीच्या गादीवर असतांना मेवाडात राणा रतनसिंह गादीवर होता आणि चित्तोडगड ही त्याची राजधानी होती. सौंदर्यवती असली; तरीही मेवाडची महाराणी पद्मावती लहानपणापासून युद्धकौशल्यात निपुण होती. तिच्या स्वयंवराचा पण असा होता की, जो कुणी तिने निवडलेल्या सैनिकाला लढाईत हरवेल, त्याच्याच गळ्यात ती वरमाला घालेल. असे म्हणतात की, तो सैनिक म्हणजे स्वतः पद्मिनीच असे ! राणी पद्मिनीच्या अनुपम सौंदर्याचे वर्णन ऐकून पद्मिनीसाठी खिलजीने जानेवारी १३०३ मध्ये चित्तोडगडावर स्वारी केली. राजपुतांनी त्याचा चिवट प्रतिकार केला. जेव्हा राणी पद्मिनीला चित्तोडचा पराभव दिसू लागला, तेव्हा तिने खिलजीच्या स्वाधीन होण्यापेक्षा अग्नीसमर्पणाचा कठोर निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर समवेतच्या सहस्रो स्त्रियांना त्या उदात्त समर्पणासाठी प्रेरित केले !
शेवटच्या क्षणी रतनसिंह त्याच्या मूठभर सैन्यासह विशालकाय मोगल सेनेवर तुटून पडला, त्या वेळी किल्ल्यात प्रचंड अग्नी प्रज्वलित करण्यात आला. राणीसमवेत असंख्य राजपूत स्त्रियांनी धगधगत्या अग्नीत प्रवेश करून शीलरक्षणासाठी आत्मबलीदान केले. ज्या सौंदर्यावर संपूर्ण भारताला गर्व होता, त्याची आहुती राणीने शील आणि धर्म यांच्या रक्षणासाठी दिली. खिलजी जेव्हा किल्ल्यात पोचला, तेव्हा त्याच्या हाती लागली ती केवळ राख !
आज स्त्रिया त्यांच्या सौंदर्याचे भांडवल करत पैसे कमावत आहेत. काही सामान्य स्त्रियाही त्यांचे अनुकरण करून त्यांच्या देहाचे प्रदर्शनच मांडतात. महिलांनी महाराणी पद्मिनीच्या जोहाराचे, त्या गौरवशाली इतिहासाचे एक क्षण तरी स्मरण करावे आणि सर्वत्र चालू असलेला स्त्रीदेहाचा बाजार बंद होण्यासाठी पुढाकार घ्यावा. हेच खरे देवीस्मरण ठरेल !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.