Netanyahu to Lebanon : लेबनॉनची स्थिती गाझासारखी करू !
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची लेबनॉनला धमकी
तेल अविव – इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामधील संघर्ष वाढत चालल्याचे दिसून येत आहे. हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला याला ठार केल्यानंतरही इस्रायलने त्याचा उत्तराधिकारी हाशेम सफीद्दीन यालाही ठार मारल्याचे वृत्त आहे. यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ‘लेबनॉनची परिस्थिती गाझासारखी करू’, अशी धमकी दिली आहे. या धमकीनंतर इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या दक्षिणी किनारपट्टीवर हिजबुल्लाच्या विरोधातील आक्रमणे अधिक तीव्र केली आहेत. नेतान्याहू यांनी लेबनॉनला धमकी दिल्यानंतर दोन्ही देशांतील परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
हिजबुल्लापासून तुमचा देश मुक्त करा ! – लेबनॉनच्या नागरिकांना आवाहन
नेतान्याहू यांनी लेबनॉनच्या जनतेला उद्देशून म्हटले आहे, ‘लेबनॉनने हिजबुल्लाला तुमच्या सीमेत काम करण्याची अनुमती दिली, तर देशाची स्थिती गाझासारखी होऊ शकते. हिजबुल्लापासून तुमचा देश मुक्त करा. त्याला (हिजबुल्लाच्या आतंकवाद्यांना) देशातून बाहेर काढा. असे केल्याने हे युद्ध संपू शकेल आणि पुढील विध्वंस टाळता येईल.’