Dinesh Gundurao On Savarkar : (म्‍हणे) ‘गांधी शाकाहारी आणि सावरकर मांसाहारी होते, असा दोघांमधील केवळ भेद सांगितला होता !’

कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील आरोग्‍यमंत्री दिनेश गुंडूराव यांचा सावरकरांवरील विधानावर सारवासारव करण्‍याचा प्रयत्न

मंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील आरोग्‍यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी गांधी जयंतीच्‍या कार्यक्रमात ‘चित्‍पावन ब्राह्मण वीर सावरकर गोमांस खात असत’, असे विधान केले होते. या विधानावर पोलिसांत तक्रार करण्‍यात आल्‍यानंतर चिक्‍कबळ्ळापूर येथे स्‍पष्‍टीकरत देतांना दिनेश गुंडूराव म्‍हणाले, ‘‘गांधीजी हिंदु धर्माचे अनुयायी होते. त्‍यांची देवावर नितांत श्रद्धा होती आणि ते शाकाहारी होते; पण सावरकर नास्‍तिक होते आणि मांसाहारी होते. मी दोघांमधील भेदच सांगितला आहे. मी सावरकरांवर टीका केलेली नाही.’’

(खोटारडे गुंडूराव ! गुंडूराव यांनी सावरकर गोमांस खात होते, असे विधान केले होते आणि आता ते कोलांटी उडी मारून ‘ते मांसहारी होते’, असे सांगून त्‍याचे गांभीर्य अल्‍प करण्‍याचा प्रयत्न करत आहेत. त्‍यांनी कितीही सारवासारव करण्‍याचा प्रयत्न केला, तरी काँग्रेसवाल्‍यांची सावरकरांविषयी आणि गायीविषयी काय मानसिकता आहे, हे देशवासीयांना ठाऊक आहे ! – संपादक)

सौजन्य:Times Now

गुंडूराव पुढे म्‍हणाले की, गांधीजींची गायीच्‍या पूजेवर श्रद्धा होती, ती सावरकरांमध्‍ये नव्‍हती. सावरकरांनी म्‍हटले होते की, ‘गाय एक प्राणी आहे, मग तिची पूजा का करता?’ (सोयीनुसार असणारी विधाने काढून समाजामध्‍ये द्वेष पसरवणारी काँग्रेस ! सावरकर यांनी अनेक विधाने केली आहेत जी समाजाने स्‍वीकारली आहेत. त्‍याविषयी काँग्रेस का बोलत नाही ? – संपादक) सावरकर तर्कशुद्ध विचार करणारे होते, असे मी म्‍हटले होते. (सावरकर तर्कशुद्ध विचार करणारे होते, याची जाणीव काँग्रेसवाल्‍यांना याच प्रकरणात कशी झाली ? त्‍यांनी अनेक तर्कशुद्ध विचार मांडले आहेत जे काँग्रेसने स्‍वीकारलेले नाहीत ! – संपादक)

संपादकीय भूमिका

स्‍वतःचे शब्‍द कसे फिरवायचे यात काँग्रेसवाले अत्‍यंत पटाईत आहेत, हे यातून पुन्‍हा दिसून आले. सावरकरांना ‘गोमांस भक्षण करणारे’ म्‍हटल्‍यानंतर अशा प्रकारे कितीही स्‍पष्‍टीकरण दिले, तरी काँग्रेसवाल्‍यांना जनता ओळखून आहे !