Importance Of Yoga In US : अमेरिकेत गेल्‍या २ दशकांत योग करणार्‍यांच्‍या संख्‍येत ५०० टक्‍क्‍यांची वाढ !

  • २० टक्‍के अमेरिकी नागरिक करतात योग !

  • ७५ टक्‍के अमिरिकी नागरिक योगाला आरोग्‍यासाठी मानतात लाभदायक !

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – अमेरिकेत प्रत्‍येक पाचवा अमेरिकी म्‍हणजेच, तब्‍बल २० टक्‍के लोक योग (योगासने) करतात. अमेरिकेत आता याला केवळ शारीरिक व्‍यायाम म्‍हणून पाहिले जात नसून आरोग्‍य, अध्‍यात्‍म, आध्‍यात्‍मिक शांतता आणि साधना यांच्‍या रूपाने त्‍याकडे पाहिले जात आहे. वर्ष २००२ मध्‍ये जिथे केवळ ४ टक्‍के अमेरिकी नागरिक योगाचा सराव करत असत, आता ती संख्‍या ५०० टक्‍क्‍यांनी (पाच पटींनी) वाढली आहे. यातही महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. २३ टक्‍के अमेरिकी महिला योग करतात. विशेष म्‍हणजे ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्‍हेंशन’ (‘सीडीसी’च्‍या) ताज्‍या आकडेवारीनुसार ७५ टक्‍के अमेरिकी नागरिक मानतात की, योग त्‍यांच्‍या आरोग्‍यासाठी लाभदायी आहे.

‘सीडीसी’च्‍या सर्वेक्षणातील आकडेवारी !

१. ९० टक्‍के अमेरिकी नागरिक योगाची माहिती जाणून घेत आहेत. ३ वर्षांपूर्वी ही संख्‍या ७५ टक्‍के होती.

२. ७० टक्‍के अमेरिकी लोक आरोग्‍य चांगले करण्‍यासाठी योग करतात.

३. ३० टक्‍के लोक वेदना अल्‍प करण्‍यासाठी करतात. त्‍यातही मान आणि पाठ दुखी यांनी त्रस्‍त लोक योगाचे साहाय्‍य घेत आहेत.

योगामागील तत्त्वज्ञान समजण्‍याचाही केला जात आहे प्रयत्न !

योग करणारे अमेरिकी आता त्‍याचा इतिहास आणि तत्त्वज्ञान समजण्‍याचाही प्रयत्न करत आहेत. यासाठी अनेक विद्यापिठे आणि संशोधन संस्‍था यांचे विद्वान योगच्‍या गहन पैलूंवर अभ्‍यास अन् प्रशिक्षण देत आहेत. महिला त्‍याकडे मानसिक शांतता आणि संतुलन कायम राखण्‍यासाठी निवडतात. प्रतिदिन योग केल्‍याने मानसिक संतुलनात साहाय्‍य मिळत असल्‍याचे अनेक अमेरिकी लोकांचे म्‍हणणे आहे. (जिवाचे शिवाशी मिलन असा ‘योग’चा वास्‍तविक अर्थ आहे. त्‍यामुळे योगाच्‍या तत्त्वज्ञानाविषयी जिज्ञासा असणार्‍या अमेरिकी लोकांना हिंदु धर्मानुसार साधना सांगून त्‍यांना हिंदू बनण्‍यासाठी प्रेरित केले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

योग ही हिंदु धर्माने जगाला दिलेली अद्वितीय देणगी असून अमेरिकेला त्‍याच्‍या अपरिहार्यतेची आता चांगलीच जाणीव झाली आहे. याचा लाभ भारत सरकारने घेऊन योगाला आता त्‍याचे यथोचित स्‍थान देण्‍यासाठी त्‍याचा ‘हिंदु योग’ म्‍हणून प्रचार केला पाहिजे !