Omar Bin Laden : फ्रान्‍सने ओसामा बिन लादेन याच्‍या मुलावर देशात प्रवेश करण्‍यास घातली कायमची बंदी !

आतंकवादाला प्रोत्‍साहन देणारे लिखाण केल्‍यामुळे फ्रान्‍स सरकारचा निर्णय

आतंकवादी ओसामा बिन लादेन (उजवीकडे) व त्याचा मुलगा ओमर बिन लादेन (डावीकडे)

पॅरिस (फ्रान्‍स) – अमेरिकेने ठार मारलेला जिहादी आतंकवादी ओसामा बिन लादेन याचा मुलगा ओमर बिन लादेन याला फ्रान्‍समध्‍ये येण्‍यापासून कायमस्‍वरूपी बंदी घालण्‍यात आली आहे. फ्रान्‍सचे गृहमंत्री ब्रुनो रितेओ यांनी ८ ऑक्‍टोबरला या आदेशावर स्‍वाक्षरी केली. ते म्‍हणाले की, ४३ वर्षीय ओमर याने सामाजिक माध्‍यमांवर आतंकवादाला प्रोत्‍साहन देणारी पोस्‍ट केल्‍याने हा निर्णय घेण्‍यात आला आहे. ओमर वर्ष २०१६ पासून फ्रान्‍सच्‍या नॉर्मंडी शहरात रहात होता.

ओमरने वर्ष २००६ मध्‍ये ब्रिटीश नागरिक झैना महंमद अल-सबाह (पूर्वाश्रमीच्‍या जेन फेलिक्‍स ब्राऊन) हिच्‍याशी विवाह केला. त्‍यानंतर त्‍याला फ्रान्‍समध्‍ये रहाण्‍याची अनुमती मिळाली. येथे तो चित्रे काढून उदरनिर्वाह करत असे. गेल्‍या वर्षी त्‍याने ओसामा बिन लादेन याच्‍या वाढदिवसानिमित्त आतंकवादाचे समर्थन करणारी पोस्‍ट केल्‍याने फ्रान्‍सने त्‍याला देशात रहाण्‍याचा त्‍याचा परवाना २ वर्षांसाठी रहित केला. तेव्‍हापासून तो पत्नीसह कतारला गेला. आता मात्र त्‍याच्‍यावर कायमची बंदी घालण्‍यात आली आहे.

ओमर बिन लादेनचा इतिहास !

ओमर हा ओसामाचा चौथा मुलगा असून त्‍याने जिहादी आतंकवादी संघटना अल्-कायदाच्‍या प्रशिक्षण केंद्रामध्‍ये आतंकवादाचे प्रशिक्षणही घेतले आहे. ओमर वर्ष १९९१ ते १९९६ पर्यंत वडिलांसमवेत सुदानमध्‍ये रहात होता. वर्ष २००१ मध्‍ये वडिलांना सोडल्‍यानंतर ओमरने स्‍वीकारले की, त्‍याने अल्-कायदाच्‍या प्रशिक्षण शिबिरांमध्‍ये शस्‍त्रास्‍त्रांचे प्रशिक्षण घेतले होते.

संपादकीय भूमिका

सामाजिक माध्‍यमांवर आतंकवादाला प्रोत्‍साहन देणारी पोस्‍ट केल्‍यामुळे ओसामा बिन लादेन याच्‍या मुलाला देशात येण्‍यास बंदी घालणार्‍या फ्रान्‍सकडून भारताने बरेच काही शिकण्‍यासारखे आहे. भारतात बर्‍याच धर्मांधांकडून आतंकवाद्यांची पाठराखण केली जाते. भारत अशांवर काय कारवाई करणार ?