वर्ष २०२४-२५ पासून नोंदणीकृत गोशाळांना प्राप्त होणार अनुदान !
मुंबई – महाराष्ट्र शासनाने गोशाळांतील गायीचे पालन-पोषण यांसाठी प्रतिदिन प्रतिगाय ५० रुपये इतके अनुदान घोषित केले आहे. वर्ष २०२४-२५ पासून महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळेतील गायींसाठीच हे अनुदान प्राप्त होणार आहे. याविषयीचा कृषी, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांद्वारे ८ ऑक्टोबर या दिवशी शासन आदेश काढण्यात आला आहे.
गोशाळांसह महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेली गोसदन, पांजरपोळ आणि गोरक्षण संस्था याही अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत. हे अनुदान प्राप्त होण्यासाठी गोशाळेला किमान ३ वर्षांचा गोसंगोपनाचा अनुभव असणे आवश्यक आहे, तसेच संबंधित गोशाळेमध्ये किमान ५० गायी असणे आवश्यक आहे. अनुदानासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी जिल्हा गोशाळा पडताळणी समितीच्या वतीने केली जाणार आहे.