राज्यात महिलांसाठी विशेष बसगाड्या चालू होणार !

मुंबई – मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजना आणि महिला सन्मान योजना लागू झाल्यावर महिलांना केंद्रस्थानी ठेवून राज्यात आणखी योजना राबवण्यात येणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाने राज्यात महिला प्रवासी विशेष अर्थात्, ‘पिंक एस्.टी.’ चालू करण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यातील ६ महानगरांचा समावेश करण्यात आला आहे.

बरेचदा महिला प्रवाशांना गाडीत गर्दीमुळे उभ्याने प्रवास करावा लागतो. अनेक ठिकाणी महिला प्रवाशांकडून वाहकांकडे तक्रारीचा पाढा वाचला जातो. यामुळे महिलांसाठी विशेष बस सेवा चालू करण्याचा प्रस्ताव महामंडळाचा आहे. या पार्श्वभूमीवर प्रारंभी मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर अशा ६ विभागांत महिला विशेष एस्.टी. सेवा चालू करण्यात येईल. हळूहळू याचा विस्तार वाढवण्यात येईल.