मंत्री आलेक्स सिक्वेरा हिंदूंचे प्रतिनिधी या नात्याने विधान करू शकत नाहीत ! – खासदार तानावडे
मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी गोमंतकियांच्या रक्तात फ्रान्सिस झेवियर यांचा ‘डी.एन्.ए.’ असल्याचे विधान केल्याचे प्रकरण
पणजी, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी ७ ऑक्टोबर या दिवशी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना समस्त गोमंतकियांच्या रक्तात फ्रान्सिस झेवियर यांचा ‘डी.एन्.ए.’ असल्याचे विधान केले होते. त्या विधानाचे पडसाद भाजपमध्ये जोरदार उमटले. भाजपचे प्रवक्ते गिरीराज वेर्णेकर यांनी वैयक्तिक स्तरावर विधानाला आक्षेप घेतल्यावर मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी त्वरित या विधानाविषयी क्षमा मागितली. याविषयी ८ ऑक्टोबर या दिवशी पणजी येथे एका पत्रकार परिषदेत बोलतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले, ‘‘मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी त्यांच्या विधानाविषयी क्षमा मागितली आहे. मंत्री सिक्वेरा हे हिंदूंचे प्रतिनिधी या नात्याने विधान करू शकत नाहीत.’’
प्रारंभी ७ ऑक्टोबर या दिवशी मंत्री आलेक्स सिक्वेरा क्षमा मागतांना म्हणाले, ‘‘गोमंतकीय हे शांतताप्रिय आहेत. सर्वजण या ठिकाणी बंधूभावाने रहातात, धार्मिक सलोखा जपला जात आहे आणि हाच ‘डी.एन्.ए.’ सर्वांच्या रक्तात असल्याचे आपल्याला म्हणायचे होते; मात्र फ्रान्सिस झेवियर यांचा ‘डी.एन्.ए.’ सर्वांच्या रक्तात असल्याचे उद्गार आपल्या तोंडून आले. जर यामुळे कुणी दुखावला असेल, तर मी सर्वांची क्षमा मागतो.’’