रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘देवी होम’ यज्ञाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. देवी होम झाल्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ देवीरूपात दिसणे आणि ‘त्या सर्व साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे दिसणे

‘नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘देवी होम’ होता. तो दिवस माझा आनंदात आणि गुरुस्मरण करण्यात व्यतित झाला. मी यज्ञस्थळी बसून नामजप केला. मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या देवी रूपात दिसल्या. त्या सर्व साधकांना आशीर्वाद देत स्मितहास्य करत होत्या.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले विष्णूच्या रूपात दिसणे, त्यांचे रूप मनमोहक असणे आणि  ते वात्सल्यभावाने स्मितहास्य करत असणे

मला सूक्ष्मातून दिसले, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या पाठीमागे गुरुदेव विष्णूच्या रूपात उभे आहेत. त्यांच्या मस्तकावर सोनेरी मुकुट आणि गळ्यात पांढर्‍या फुलांची माळ आहे. त्यांनी आभूषणे परिधान केली आहेत. त्यांचे रूप सर्वांना मोहून टाकणारे होते. ते वात्सल्यभावाने स्मितहास्य करत होते.’ हे सर्व पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. माझ्या डोळ्यांतून अश्रू वहात होते.

कु. पूजा कदम

३. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यावर स्वर्गातून पांढर्‍या फुलांची पुष्पवृष्टी होत आहे’, असे सूक्ष्मातून दिसणे

त्यानंतर निवासस्थानी जाण्यासाठी बसजवळ जातांना मी पुन्हा यज्ञदेवतेला नमस्कार केला. तेव्हा मला सूक्ष्मातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यावर पांढर्‍या फुलांची पुष्पवृष्टी होतांना दिसली. त्यांच्या गळ्यात पांढर्‍या फुलांचा हार होता. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ नमस्काराच्या मुद्रेत होत्या.

४. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनाच ‘साधकांची साधना व्हावी’, याची तळमळ अधिक आहे’, असे जाणवणे

परात्पर गुरु डॉक्टर केवळ आणि केवळ आपली अपार प्रीती अन् अपार कृपा यांमुळे मला हे अनुभवता आले. माझी सतत भावजागृती होत होती. तेव्हा मला जाणवले, ‘परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ माझ्या समवेत सतत आहेत. ‘साधकांची साधना व्हावी’, याची त्यांनाच साधकांपेक्षा तळमळ अधिक आहे.’

५. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या अंतरंगी केवळ ‘गुरुस्मरण अन् गुरुसेवा’ यांचा ध्यास असणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ स्वतःला झोकून देऊन साधकांसाठी सर्वकाही करतात. त्यांच्या अंतरंगी केवळ गुरुस्मरण आणि गुरुसेवेचा ध्यास आहे. त्यांच्याकडून मला सतत गुरुस्मरण, साधना आणि सेवा होण्यासाठी तळमळ अन् चिकाटी शिकायला मिळाली.

६. कृतज्ञता

‘हे गुरुदेवा, तुम्ही माझ्या मनाची स्थिती जाणता. तुम्ही इतके कृपाळू आहात की, त्याची गणनाच कधी होऊ शकत नाही. आपल्या आणि श्रीसत्‌शक्ति(सौ.) सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कृपेमुळे हे सर्व अनुभवायला मिळाले. हे सर्व तुमच्याच पावन चरणी अर्पण. कृतज्ञ आहे.’

– कु. पूजा कदम, वास्को, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक