इस्रायल-इराण संघर्षाचा भारतावर होऊ शकणारा परिणाम !
इस्रायल हा इराणच्या तेलविहिरी, तसेच तेल शुद्धीकरण प्रकल्प उद्ध्वस्त करण्याचा विचार करत आहे, असे म्हणतात. असे झाले, तर जगाचा तोटा होईल तो होईलच; पण भारताचे अर्थकारण आणि एकूण विकासाची वाटचाल यांना तो जबर फटका असेल.
१. भारताने इराणकडून तेल घेणे चालूच ठेवावे !
अनेकदा इराणकडून आयात होणार्या तेलाचे प्रमाण आवश्यकतेच्या १० टक्क्यांच्या वर असते. रशिया-युक्रेन यांच्या संघर्षात जसे भारताने दबावाखाली न येता रशियाकडून तेल घेणे थांबवले नाही, तसेच इराणविषयीही जागतिक दादागिरी करणार्या देशाचे फर्मानही आपण कधी ऐकले नाही. अर्थात् इराणच्या तेलविहिरी उद्ध्वस्त करण्यापूर्वी इस्रायलला १० वेळा तरी विचार करावा लागेल. नुकताच आखाती संघर्ष चालू झाल्यापासून तेलाच्या किमती अनुक्रमे ३ टक्के आणि २ टक्के अशा एकूण ५ टक्क्यांनी वधारल्या आहेत. जगभर ‘शेअर’ (समभाग) बाजारांमध्ये थोडी जरी अस्थिरता आली, तरी लगेच सोने वधारते. या सार्या घटनाक्रमात आधी युद्धग्रस्त इराणचे आणि नंतर इतर आखाती देशांमधील खनिज तेल भारताला मिळाले नाही, तर अनाठायी प्रसंग उभा राहील. तशी दुश्चिन्हे दिसत आहेत.
२. भारताचा इराणशी युद्धसराव चालूच !
इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली असतांनाच इराण आणि भारत यांच्या नौदलांचा संयुक्त युद्धसराव चालू आहे. असे युद्धसराव अचानक होत नाहीत आणि त्यांची सिद्धता अनेक मास चालू असली, तरी आखातात संघर्ष पेटल्यानंतर भारताने हा युद्धसराव रहित केला नाही. मोठ्या युद्धाचे काळे ढग आखाती आकाशात भरून आलेले असतांना भारताच्या युद्धनौका आखातात असणे, याला अतिशय महत्त्व आहे. हा औपचारिक युद्धसराव संपल्यानंतर इराणच्या विनंतीने किंवा स्वत:हून भारतीय युद्धनौका तेथील मुक्काम वाढवतात का ?, हे पहावे लागेल.
३. इराण आणि इस्रायल यांच्यात शांती चर्चा होणे महत्त्वाचे !
‘इराण आणि इस्रायल यांच्या संवादासाठी भारत प्रयत्न करील का ?’, या प्रश्नावर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ३ दिवसांपूर्वी होकारार्थी उत्तर दिले; मात्र भारताला रशिया अन् युक्रेन यांच्या संघर्षात अशी कोणतीही भूमिका अद्याप बजावता आलेली नाही. तेव्हा इराण आणि इस्रायल भारताचे ऐकतील, असा समज करून घेण्यात काही अर्थ नाही. अर्थात् हा संघर्ष टळला, तर जागतिक शांतीइतकाच भारतीय अर्थकारण वाचवण्याचा प्रमुख उद्देशही साध्य होणार आहे. युक्रेन-रशिया युद्धाचा मोठा फटका भारताला आज बसत आहे. आखाती संघर्ष अधिक पेटला, तर तो कित्येक पटींनी वाढेल.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (६.१०.२०२४)