व्यायाम करण्याचा कंटाळा येत आहे ? मग हे करा !
निरोगी जीवनासाठी व्यायाम – भाग १६
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/840511.html
व्यायामाची गोडी निर्माण होण्यासाठी आनंद देणारा व्यायाम प्रकार निवडा !
‘काही जणांना काही व्यायाम प्रकार शरिरासाठी उपयोगी वाटतात; म्हणून ते करत असतात; परंतु त्यांना त्यात आनंद मिळत नसल्यामुळे हे प्रकार नियमितपणे करण्याचा त्यांचा उत्साह टिकून रहात नाही. स्वतःत व्यायामाची गोडी निर्माण करत असतांना ‘जेव्हा शरीर आणि मन यांना आनंद मिळतो, तेव्हा सातत्य आपोआप येते’, हे सूत्र लक्षात ठेवावे. अनेकांना व्यायाम करणे कंटाळवाणे वाटते. त्यामुळे आरंभी तो आनंददायी वाटण्यासाठी आणि व्यायामाची गोडी निर्माण होण्यासाठी आपल्याला आनंद देणारा अन् सातत्याने करता येईल, असा व्यायाम प्रकार निवडणे अत्यावश्यक आहे, उदा. मोकळ्या हवेत चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे, खेळणे आणि योगासने करणे, हे सर्व प्रकार शरिराला ताजेतवाने ठेवतात अन् मनाला उत्साह देतात.
काही जणांना नृत्य करायला आवडते, तर काहींना मित्र-मैत्रिणींच्या समवेत खेळण्यात आनंद मिळतो. अशा शारीरिक क्रियांमध्ये सहभागी झाल्याने त्यात आपोआप गोडी निर्माण होईल आणि त्यातून मिळणारा आनंद नियमितपणे व्यायाम करण्यास प्रोत्साहन देईल.
‘कंटाळा येणे’, ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी ‘व्यायामात विविधता आणणे, छोटी छोटी ध्येये ठेवणे आणि आवडीचे प्रकार शोधून काढणे’, हे उपाय कंटाळा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. महत्त्वाचे म्हणजे ‘व्यायामाचा आनंद घेणे’, हे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी लाभदायक आहे. एकदा का व्यायाम करण्यात रुची निर्माण झाली की, तो दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनेल !’
– कु. वैदेही राजेंद्र शिंदे, भौतिकोपचार (फिजिओथेरपी) अभ्यासक, फोंडा, गोवा. (३०.९.२०२४)
साधकांनो, व्यायामाचे विविध लाभ जाणा आणि थकवा किंवा इतर शारीरिक अडचणी असल्या, तरी प्रतिदिन थोडा व्यायाम करा !
‘काही वेळा साधकांना आध्यात्मिक त्रासांमुळे शारीरिक थकवा येतो. त्यामुळे साधक व्यायाम करू शकत नाहीत. जर त्यांनी व्यायाम केला नाही, तर त्यांच्या शारीरिक त्रासात वाढ होऊ शकते. साधकाने एरव्ही एखादा व्यायाम प्रकार १० वेळा करणे अपेक्षित असेल, तर थकवा असल्यास तो व्यायाम प्रकार न्यूनतम एकदा तरी करावा.
व्यायामामुळे ‘बळ वाढणे, शारीरिक क्षमता वाढणे’, इत्यादी शारीरिक आणि ‘मनोबल अन् उत्साह वाढणे’ इत्यादी मानसिक लाभ होतातच, तसेच ‘स्वतःभोवतालचे अनिष्ट शक्तींचे आवरण न्यून होणे, हलके वाटणे, मनातील विचार न्यून होऊन एकाग्रता वाढणे आणि त्यामुळे साधना अन् सेवा यांची फलनिष्पत्ती वाढणे’, इत्यादी आध्यात्मिक लाभही होतात. हे लाभ लक्षात घेऊन साधकांना शारीरिक अडचणी असल्या, तरीही त्यांनी प्रतिदिन थोडा तरी व्यायाम करणे आवश्यक आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise