पाकिस्तान केवळ इस्लामी आतंकवादातच नव्हे, तर धार्मिक आतंकवादी  कारवायांमध्येही गुंतला आहे !

‘पाकिस्तानमधील मानवाधिकार’ या विषयावर ब्रिटीश संसदेत परिषदेचे आयोजन  

प्रतिकात्मक छायाचित्र

लंडन – ‘एशियन ह्युमन राईट्स फोरम’ने (ए.एच.आर्.एफ्.ने) पाकिस्तानातील मानवाधिकारांच्या क्रूर उल्लंघनाकडे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने ‘पाकिस्तानमधील मानवाधिकार’ या विषयावर ब्रिटीश संसदेत एक परिषद आयोजित केली आहे. ‘पाकिस्तान केवळ इस्लामी आतंकवादातच नव्हे, तर धार्मिक आतंकवादी कारवायांमध्येही गुंतलेला आहे’, असे या संघटनेने म्हटले आहे.

१. पाकिस्तानमध्ये मानवी हक्कांच्या उल्लंघनांमध्ये वांशिक अल्पसंख्याक, धार्मिक अल्पसंख्याक हिंदु, तसेच हजारा, पख्तून, अहमदी, सिराकी समुदाय यांचा वंशविच्छेद, धार्मिक छळ, बलपूर्वक धर्मांतर, महिलांविरुद्ध भेदभाव आणि हिंसाचार, अल्पसंख्यांकांचे अपहरण करणे, आतंकवादी गट बनवणे आणि त्यांना खतपाणी घालणे, अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि पत्रकारितेचे स्वातंत्र्य यांवर निर्बंध यांचा समावेश आहे.

२. पत्रकारांवरील हिंसाचाराच्या बातम्या, विदेशात रहाणार्‍या आणि पाकिस्तानच्या विरोधात बोलणार्‍यांना दिल्या जाणार्‍या धमक्या चिंताजनक आहेत.

३. पाकिस्तानमधील ईश्‍वरनिंदेच्या कायद्यांमुळे मानवी हक्कांचे व्यापक उल्लंघन झाले आहे, ज्यात मनमानी अटक, खटल्याविना दीर्घकाळ कारागृहात ठेवणे आणि न्यायालयीन हत्या यांचा समावेश आहे.

४. हिंदूंवरील अत्याचारांमध्ये बलपूर्वक धर्मांतर, अपहरण, बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि गुलामगिरी यांचा समावेश आहे. पाकिस्तानातील हिंदूंकडे केवळ इस्लाम स्वीकारणे, जिझिया कर भरणे, पलायन करणे किंवा मरण्यास सिद्ध होणे एवढेच पर्याय शेष आहेत.

५. पाकिस्तानात अहमदिया समुदायाला मोठ्या प्रमाणात छळ आणि धार्मिक हक्कांच्या उल्लंघनाचा सामना करावा लागतो.

६. सिंधु प्रदेश, बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा, पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान येथे मानवी हक्कांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत आहे.

७. पाकिस्तानात महिलांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. पाकिस्तानातील मुली आणि महिल यांना शिक्षणाच्या अल्प संधी उपलब्ध आहेत. त्यांना घरगुती हिंसाचार, अ‍ॅसिड आक्रमणे आणि बालविवाह अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

८. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात गेल्या ४ महिन्यांत ५ सहस्र ५५१ महिलांचे अपहरण झाल्याचे सांगणारा पंजाब पोलिसांचा ताजा अहवाल धक्कादायक आहे. अपहरणकर्ते आणि बलात्कारी यांच्या दबावामुळे अपहरण आणि बलात्कार यांच्या बहुतांश घटना कुटुंबांद्वारे नोंदवल्या जात नाहीत ही वस्तूस्थिती आहे.

९. आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानी सैन्यदलाला ‘आतंकवादी संघटना’ म्हणून घोषित करावे आणि पाकिस्तानवर बंदी घालावी.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानचे खरे स्वरूप जगासमोर आले आहे; मात्र कुणीही त्याला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न करत नाही किंवा त्याच्यावर जागतिक स्तरावर बहिष्कार घालत नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया थांबत नाहीत !