पारंपरिक गरबा नृत्य, त्याचे महत्त्व आणि लाभ अन् आधुनिकतेच्या नावाखाली सध्या केल्या जाणार्या गरबा नृत्याने होणारी हानी !
‘देवीचा नवरात्रोत्सव भारतातील महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, राजस्थान, गुजरात आणि तमिळनाडू या राज्यांत साजरा करण्यात येतो. नवरात्रीत देवीमातेची शक्ती अधिक कार्यरत असते. त्या ९ दिवसांत आपण जेवढी अधिक भक्ती करू, तेवढी देवीमाता अधिक प्रसन्न होते. देवीला प्रसन्न करण्यासाठी ठिकठिकाणी गरबा नृत्य केले जाते आणि दांडिया रास खेळला जातो. गरब्याच्या गीतांमध्ये अंबामाता आणि श्रीकृष्णलीला यांचे वर्णन गायले जाते. सध्याच्या काळात नवरात्रीमध्ये लोक पावित्र्याचा विचार न करता कशाही प्रकारे नृत्य करतात. ते पाहून मनाला पुष्कळ दुःख होते. या लेखात ‘गरबा नृत्याचे महत्त्व, त्याचे लाभ, तसेच पारंपरिक गरबा आणि सध्याचा गरबा यांतील भेद’ इत्यादी सूत्रे दिली आहेत.
(भाग १)
१. गरबा
हे ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. गरबा या शब्दाची उत्पत्ती ‘गर्भदीप’, या संस्कृत शब्दापासून झाली. नवरात्रीत ९ दिवस अखंड दीप लावून शक्तीचा जागर म्हणून गरबा खेळला जातो.
१ अ. गर्भदीप : गर्भा म्हणजे मातीचा घडा. या घड्यात दिवा ठेवला की, त्याला ‘गर्भदीप’ म्हणतात. गर्भदीपात श्री नवदुर्गादेवीचा वास असतो. या गर्भदीपाला माता, म्हणजे शक्तीचे प्रतीक मानले गेले आहे. सच्छिद्र (छिद्रे असलेल्या) मातीच्या घटात दिवा तेवत ठेवतात. हा घट, म्हणजे मनुष्याच्या शरिराचे आणि त्यात तेवत असलेला दिवा, म्हणजे शुद्ध आत्म्याचे प्रतीक मानले जाते. ‘ही आत्मरूपी ज्योत अखंड तेवत राहो. उदंड आयुष्य मिळो’, अशी प्रार्थना आदिशक्ती श्री दुर्गादेवीकडे केली जाते.
गरबा नृत्याला आरंभ करण्यापूर्वी छिद्रे असलेल्या मातीच्या घड्याच्या (मडक्याच्या किंवा भांड्याच्या) आत दीप प्रज्वलित करून महाशक्तीचे आवाहन केले जाते. त्या सुशोभित केलेल्या घड्याला २७ छिद्रे असतात. ९ छिद्रांची एक ओळ असते आणि अशा एकूण ३ ओळी असतात. ‘ही २७ छिद्रे, म्हणजे २७ नक्षत्रे आहेत’, असे मानले जाते. एका नक्षत्रामध्ये ४ चरण असतात. २७ नक्षत्रे Ñ ४ चरण = १०८. ही महाशक्तीची भक्तीपिठे आहेत.
२. गरबा नृत्याचे महत्त्व
नवरात्रीत गर्भदीप मध्यभागी ठेवून गरबा खेळला जातो. गरबा खेळतांना आपण जेव्हा मध्यभागी ठेवलेल्या गर्भदीपाच्या भोवती गोल फिरतो, तेव्हा आपल्याला पूर्ण ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य प्राप्त होते.
३. देवीचा मंडप आणि देवीचे आसन
देवीचा मंडप लाल वस्त्राने सजवला जातो. देवीचे आसन लाकडी असते. आसनाच्या चारही बाजूंना देवीची चित्रे लावतात आणि संपूर्ण आसनाच्या भोवती चारही बाजूंना दिवे लावले जातात. सर्वांत वर ‘गर्भदीप’ लावतात आणि तो सर्वांत उंच ठेवलेला असतो. त्या दिव्यांच्या मधोमध श्री नवदुर्गामातेच्या रूपांपैकी अंबामातेची मोठी प्रतिमा किंवा चित्र ठेवले जाते. देवीचे मुख सूर्यासमोर येईल, असे ठेवतात. मंडपाच्या छताला लाल वस्त्र बांधतात आणि चारही बाजूंनी लाल वस्त्र लावले जाते. त्याच्या मध्यभागी देवीचे आसन असते. त्या आसनासमोर उभे राहून लोक देवीची आरती करतात आिण देवीभोवती गोल फेर धरून गरबा खेळतात.
४. गर्भदीप लावणे
‘गर्भदीप’ नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून प्रज्वलित केला जातो. ही ज्योत नऊ दिवस अखंड प्रज्वलित ठेवली जाते. त्यामुळे पुष्कळ लाभ होतो.
५. गरबा नृत्याचे प्रकार
एकताली, दोताली, तीनताली (टीप)
टीप – एकताली, दोनताली आणि तीनताली : या प्रकारांत हातांनी विशिष्ट प्रकारे अनुक्रमे एकदा, दोनदा आणि तीनदा टाळ्या वाजवून गीतावर नृत्य केले जाते.
‘पोपट्यो, फुदडी, हींच, आडीताली, टिपणी, दांडिया आणि मटूकी पंचीया’, हे तीनताली नृत्याचे प्रकार आहेत.
५ अ. ‘तीनताली’ या प्रकारात ३ टाळ्यांच्या ध्वनीतून तेज प्रगट होणे आणि तरंग उत्पन्न होऊन त्यांतून शक्तीस्वरूपा अंबा जागृत होणे : ‘तीनताली’ या प्रकारात गरबा ३ टाळ्यांनी खेळला जातो. ‘या ३ टाळ्या, म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचे त्रिदेव (ब्रह्मा, विष्णु आणि महेश) आहेत’, असे मानले जाते. या ३ टाळ्यांद्वारे संपूर्ण ब्रह्मांडातील देवतांना आवाहन केले जाते. या ३ टाळ्यांच्या ध्वनीतून तेज प्रगट होते आणि तरंग उत्पन्न होऊन त्यांतून शक्तीस्वरूपा आई अंबा जागृत होते.
५ आ. ‘पारंपरिक गरबा’ टाळ्या वाजवून खेळला जातो. तो हातात दिवा, तसेच दांडिया, काठी किंवा तलवार घेऊन खेळला जातो.
५ इ. गरबा हातात टाळ घेऊन आणि ढोल वाजवतही खेळू शकतो. हे पूर्णतः पारंपरिक नृत्य असून सात्त्विक वाद्ये वाजवल्यामुळे देवी प्रसन्न होते.’
(क्रमशः)
– सौ. नीता मनाेज सोलंकी, मडगाव, गोवा. (२६.७.२०२४)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/842542.html