दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : माहीम येथे रहिवासी इमारतीला आग !; चोराने टेंपोतून अडीच लाख रुपये पळवले !
माहीम येथे रहिवासी इमारतीला आग !
माहीम – येथील रहिवासी इमारतीला ७ ऑक्टोबरच्या पहाटे भीषण आग लागली. आग लागल्याचे कळताच इमारतीतील रहिवाशांनी तातडीने बाहेर धाव घेतली. अग्नीशमन दलाच्या सैनिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कुणीही घायाळ झाले नाही.
चोराने टेंपोतून अडीच लाख रुपये पळवले !
नवी मुंबई – कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ ५ मिनिटांत टेंपोत ठेवण्यात आलेली अडीच लाख रुपयांची रोकड अज्ञाताने चोरली. टेंपोचालक प्रवेशद्वाराच्या ठिकाणी वाहन लावून प्रवेश पावती घेण्यासाठी उतरला होता. याच वेळेत चोरी झाली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.
धावत्या वाहनांवर बिबट्याचे आक्रमण
बुलढाणा – ६ ऑक्टोबरला सायंकाळी मोताळा तालुक्यातील रोहिणखेड-उबाळखेड मार्गावर अर्ध्या घंट्याच्या अंतराने बिबट्याने २ दुचाकीस्वारांवर अचानक आक्रमण केले. यात रोशन सुरपाटणे आणि गजानन सोनुने गंभीर घायाळ झाले. आतापर्यंत याच परिसरात बिबट्याने ४ जणांना गंभीर घायाळ केल्याच्या घटना घडूनही वन विभाग काय करत आहे ? असे संतप्त नागरिक विचारत आहेत.
पोलीस कर्मचार्याची आत्महत्या !
मीरा रोड – सागर अथनीकर (वय २३ वर्षे) हे पोलीस शिपाई वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत होते. त्यांच्या सहकार्यासह ते येथील अपना घर या संकुलात रहात होते. घरात कुणी नसतांना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरगुती वादातून ही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लाखो रुपये आणि १० तोळे सोने पळवले !
चेंबूर येथे घरातील आग विझवतांना घडलेला प्रकार !
मुंबई – चेंबूरच्या सिद्धार्थ वसाहतीतील दुकानाला लागलेल्या भीषण आगीत घरात झोपलेल्या गुप्ता कुटुंबियांतील ७ जणांचा मृत्यू झाला होता. आग विझवण्याच्या निमित्ताने घरात शिरलेल्या कुणी अज्ञाताने गुप्ता कुटुंबाच्या घरातून लाखो रुपयांची रक्कम आणि १० तोळे सोने पळवले. कुटुंबातील सदस्यांनी तिजोरीतील कागदपत्रे घेण्यासाठी घरात प्रवेश केल्यावर त्यांना तिजोरी तोडलेल्या अवस्थेत दिसली. या प्रकरणी तक्रार प्र्रविष्ट करण्यात आली आहे.