हनुमान टेकडीवर कोयत्याच्या धाकाने महाविद्यालयीन तरुणाची लूट !
पुण्यातील अनेक टेकड्यांवर लुटमारीच्या घटना
पुणे – महाविद्यालयीन तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ७० सहस्र रुपयांची सोनसाखळी लुटण्यात आल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात घडली. चोरांनी केलेल्या मारहाणीत साईराज भांड हा युवक घायाळ झाला असून या प्रकरणी चोरांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. साईराज याने या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
याचप्रमाणे कात्रज घाटातील बोगदा परिसरातही सकाळी फिरायला आलेल्या २ तरुणांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील भ्रमणभाषसंच हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी शुभम तारू यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
टेकड्यांच्या परिसरात गस्त घालण्याची सूचना !
बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपींनी महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील ऐवज लुटल्याचे अन्वेषणात उघडकीस आले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नुकतीच भेट घेतली आणि ‘बोपदेव घाट, तसेच शहरातील निर्जन ठिकाणी पोलिसांनी नियमित गस्त घालावी’, अशी सूचना त्यांनी केली. (पोलिसांना अशी सूचना का करावी लागते ? पोलिसांचे काम काय ? – संपादक) हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, पाषाण-सूस रस्त्यावरील टेकडी, बाणेर टेकडी परिसरात लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. १५ दिवसांपूर्वी बाणेर टेकडीवर महाविद्यालयीन तरुणाला मारहाण करुन चोरट्यांनी लुटले होते.
संपादकीय भूमिकापुण्यात सध्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, हे पोलिसांचा धाक संपल्याचे निर्देशक आहे ! |