विरांगनांना वंदन !
नवरात्रोत्सव विशेष
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते ।
जय तवं देवी चामुण्डे जय भूतार्तिहारिणि ।
जय सर्वगतें देवी कालरात्रि नमोऽस्तुते ।
अर्थ : दुर्गा, क्षमा, शिवा धात्री, चामुण्डा, भूतार्तिहारिणी, कालरात्री देवी तुम्हाला नमस्कार असो.
ब्रिटिशांपासूनच सैन्यात परिचारिका आदी पदांवर महिला असत. वर्ष १९४८ मध्ये भारतीय सैन्यात स्त्रियांना अन्य पदांवर, तर वर्ष १९९२ नंतर त्यांना व्यापक सैन्य प्रशिक्षण आणि सैन्यातील पदे देण्यास आरंभ झाला. वर्ष २०१३ मध्ये वायूसेनेत १३, तर नौसेनेत ६ टक्के महिला अधिकारी आहेत. मे २०२३ मध्ये वायूसेनेत २७३ महिलांची, तर नौसेनेत मार्च २०२४ मध्ये १५३ महिलांची तुकडी समाविष्ट करण्यात आली. या परंपरेचा प्रारंभ सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील महिलांच्या तुकडीपासून झाला. डॉ. लक्ष्मी सहगल या पहिल्या महिला कॅप्टन आणि त्यांच्या तुकडीने या सेनेत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. यातीलच शिपाई नीरा आर्या या भारताची पहिली महिला गुप्तहेर होत्या. नीरा यांचे पती इंग्रजांना मिळालेले होते आणि इंग्रजांनी त्यांना सुभाषबाबूंना मारण्याचे दायित्व दिले. त्यांनी सुभाषबाबूंवर गोळी झाडली, ती त्यांच्या चालकाला लागली. त्या वेळी नीरा यांनी त्यांच्या पतीच्या पोटात चाकू भोसकून सुभाषबाबूंचे प्राण वाचवले. राष्ट्रासाठी शत्रूला मिळालेल्या पतीची हत्या करण्यासही त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही ! पुढे सुभाषबाबूंचा पत्ता सांगण्यासाठी इंग्रजांनी अंदमानच्या कारागृहात ठेवून त्यांचे अनन्वित हाल केले. त्यांना साखळदंडाला बांधून ठेवले जाई. त्यांचा एक स्तन कापण्यात आला; पण त्यांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही. स्वातंत्र्यानंतर त्यांनी फुले विकून त्यांचे उर्वरित आयुष्य काढले, हे आणखी एक दुर्दैव ! वर्ष १९९८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
या सर्व विरांगनांचे मूळ आहे राणी पद्मिनी, राणी चेनम्मा आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यात ! या सर्वांकडे स्त्रीसैन्यही होते, म्हणजे स्त्रियांनी सैन्य शिक्षण घेण्याची परंपरा होती. पेशव्यांच्या स्त्रियाही युद्धकौशल्यात पारंगत होत्या आणि त्यांनी युद्धात भाग घेतला होता. या विरांगनांचे मूळ आहे असुरांच्या निर्दालनासाठी वारंवार विविध अवतार धारण करणार्या दुर्गादेवी आणि रणचंडिका कालीमातेत ! सप्तशृंगीदेवीला शस्त्रे पकडण्यासाठी १८ हस्त आहेत. दशभुजा कालीमातेचे रौद्ररूप सर्वांना परिचित आहे. या सर्वांतून एकच धडा घ्यायचा आहे. युवती आणि महिला यांनी त्यांचे क्षात्रतेज सतत जागृत ठेवले पाहिजे आणि त्यासाठी आदिशक्तीची उपासना केली पाहिजे !
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.