‘रयत’च्या वाटचालीत डॉ. पतंगराव कदम यांचे मोठे योगदान आहे ! – शरद पवार
पलूस (जिल्हा सांगली), ७ ऑक्टोबर (वार्ता.) – दिवंगत डॉक्टर पतंगराव कदम यांचे रयत शिक्षण संस्थेसाठी मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याची, कर्तृत्वाची आठवण ठेवणे, या उद्देशाने आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. या परिसरातील क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्राला याचा अभिमान आहे. देशासाठी कारखानदारीही महत्त्वाची आहे आणि तिचा प्रारंभ किर्लोस्करवाडीपासून चालू होतो. दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी मोलाचे साहाय्य केले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी येथे केले.
रयत शिक्षण संस्थेच्या आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली) या महाविद्यालयाचे ‘डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय’, असे नामकरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भारती विद्यापिठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले की, बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘रयत’ची स्थापना केली.