नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेतल्यानंतरच त्या बंद करण्याचा वरिष्ठ अधिकार्यांनी दिला आदेश !
पुणे – नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेऊन त्यांचा अभिप्राय घेतल्यानंतरच त्या बंद करण्याचा आदेश वरिष्ठ अधिकार्यांनी दिल्याने अधिकार्यांच्या मनमानी कारभाराला आता चाप बसणार आहे. शहरातील रस्ते, पाणी, सांडपाणी, क्रीडांगणे, शाळा यांसह दैनंदिन जीवनात भेडसावणार्या अनेक समस्यांविषयी महापालिकेच्या ‘पीएमसी केअर ॲप’ आणि ‘एक्स’ यांसह विविध सामाजिक माध्यमांवर नागरिक तक्रार देतात. तसेच दूरभाषवर तक्रार आल्यानंतर ती संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर कार्यवाही केली जात होती. तक्रारी सोडवण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली नसतांनाही काही विभागांकडून त्या परस्पर बंद केल्या जात होत्या. यासंदर्भात काही नागरिकांनी थेट वरिष्ठ अधिकार्यांना भेटून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. दुसरीकडे ‘पीएमसी केअर ॲप’संबंधीच्या तक्रारींचा पाढाही थांबत नव्हता. या प्रकाराची पुणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी नोंद घेतली आणि तक्रारीविषयी केलेल्या कार्यवाहीची तक्रारदारास महापालिकेच्या ‘कॉल सेंटर’मधून दूरभाष करून माहिती द्यावी आणि त्याचा अभिप्राय नोंदवल्यानंतरच तक्रार बंद करावी, असा आदेश त्यांनी दिला.
संपादकीय भूमिकाअसा आदेश का द्यावा लागतो ? अधिकार्यांना ते लक्षात येत नाही का ? |