वर्ष २०२२ मधील नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञयागांच्या वेळी आणि दसर्याच्या दिवशी साधिकेला आलेल्या अनुभूती
‘२६.९ ते ५.१०.२०२२ या कालावधीत नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञानंतर आरतीच्या वेळी मला प्रतिदिन टाळ वाजवण्याची सेवा होती. टाळ वाजवत असतांना, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भात मला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. नवरात्रीत आश्रमात होत असलेल्या यज्ञांच्या वेळी
१ अ. नवरात्रीत यज्ञाच्या वेळी आरती म्हणणार्या साधिकेच्या समवेत टाळ वाजवण्याची सेवा करणे
१. ‘नवरात्रीनिमित्त प्रतिदिन होणार्या यज्ञाच्या वेळी आरती म्हणणार्या साधिकेच्या समवेत मला टाळ वाजवण्याची सेवा मिळाली. तेव्हा माझी भावजागृती होऊन पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
२. आश्रमात नवरात्रीच्या कालावधीत ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चैतन्यमय उपस्थितीत टाळ वादनाची सेवा करायची आहे’, या विचाराने माझे मन प्रफुल्लित अन् उत्साहित झाले
१ अ ३. टाळ वाजवतांना सूक्ष्मातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या विशाल चरणांची केवळ बोटे दिसणे : मी टाळ वाजवत असतांना माझ्याकडून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांवर मानसभावाने फुले अर्पण केली जात असत. तेव्हा मला सूक्ष्मातून त्यांच्या विशाल चरणांची केवळ बोटेच दिसत असत. ते पाहूनही माझी भावजागृती होत असे.
१ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आरतीचे तबक ओवाळत असतांना
१.श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आरतीचे तबक ओवाळत असतांना एकदा मला सूक्ष्मातून दिसले, ‘पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या छायाचित्रांतून अनेक ज्योती निघून त्यांच्या हातातील तबकात असलेल्या निरांजनातील ज्योतीमध्ये सामावत आहेत.
२. त्या ज्योती पिवळ्या, पांढर्या आणि पिवळसर पांढर्या या रंगांच्या होत्या. ते पाहून ‘देवताही साधकांना चैतन्य देण्यासाठी किती आतुर झाल्या आहेत ! देवता आरतीच्या तबकातील ज्योतींमध्ये सामावून त्या माध्यमातून सर्वांना चैतन्य देत आहेत’, असे मला जाणवले.
१ इ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आरतीचे तबक ओवाळत असतांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य
१. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आरतीचे तबक ओवाळत असतांना एकदा मला सूक्ष्मातून दिसले, ‘त्या दोघींच्या हृदयातून एक एक ज्योत बाहेर पडून त्या दोन्ही ज्योती एकरूप झाल्या.
२. त्याच वेळी देवीच्या छायाचित्रातील ज्योत त्या ज्योतीशी एकरूप होऊन वातावरणात वरच्या दिशेने गेली आणि अंतर्धान पावली.’
३.‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या दोघी वेगळ्या नसून एकच आहेत, तसेच त्यांच्यातील देवीतत्त्व अन् देवीच्या छायाचित्रातील देवीतत्त्व एक होऊन ज्योती स्वरूपात प्रकट होऊन वातावरणात प्रक्षेपित होत आहे’, असे मला प्रकर्षाने जाणवले.
१ ई. आरती ग्रहण करण्यासाठी ‘देवता आणि ऋषीमुनी आले आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे : ‘साधकांना आरती ग्रहण करता यावी’, यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ हातात तबक घेऊन सावकाश गोल फिरत असत. तेव्हा एका कोपर्यात ‘अनेक देवता आणि ऋषीमुनी आरती ग्रहण करण्यासाठी आले आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले. अशी अनुभूती मला ४ – ५ वेळा आली. त्या सर्वांना पाहून मला पुष्कळ आनंद होत होता. तेव्हा ‘आदिशक्ती स्वरूपिणी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे पृथ्वीवरील प्रकट-अप्रकट रूप पहायला सर्व जण आतुर झाले आहेत’, असे मला जाणवत असे. मला ही अनुभूती दिल्याबद्दल माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत होती आणि मला आनंद होत असे.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी केसांत घातलेल्या गजर्यातील चैतन्य ग्रहण करण्यासाठी मिळणे
२ अ. साधिकेने गजरा दिल्यावर त्यातील प्रत्येक फुलात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा चेहरा दिसणे आणि ‘तो गजरा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी घातला होता’, हे नंतर समजणे अन् सगुण रूपातील देवीचे चैतन्य मिळाल्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटणे : एकदा एका साधिकेने मला गजरा आणून दिला. तो हातात घेताच मला त्यातील प्रत्येक फुलात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा चेहरा दिसला. काही वेळाने त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधिकेने सांगितले, ‘‘तो गजरा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी घातला होता.’’ (नंतर चित्रीकरणाच्या दृष्टीने अधिक टवटवीत फुलांचा गजरा त्यांनी घातला आणि आधी घातलेला गजरा साधिकेने चैतन्य मिळण्याच्या दृष्टीने मला दिला होता.) मला त्याविषयी काहीच ठाऊक नसतांना फुलांमध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा तोंडवळा दिसल्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. तो प्रसाद आणि सगुण रूपातील देवीचे चैतन्य मिळाल्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२ आ. घरी गेल्यावर गजर्याचा सुगंध वाढणे, कुटुंबियांनी गजर्याचा सुगंध घेतल्यावर त्यांना आनंदाची अनुभूती येणे : मी घरी आल्यावर माझ्या लक्षात आले, ‘त्या गजर्यातील सुगंध वाढला आहे.’ मी तो गजरा माझी आई (सौ. सविता तिवारी), बाबा श्री. सत्यनारायण तिवारी (आताचे सनातनचे १२४ वे संत पू. सत्यनारायण तिवारी, वय ७३ वर्षे) आणि माझी भाची कु. कनक मिश्रा यांना दिला. त्या तिघांनी गजर्याचा सुगंध घेताच त्यांना आनंदाची अनुभूती येऊन उत्साह अनुभवायला आला. माझे बाबा रुग्णाईत असतात. साधक त्यांना भेटायला आल्यास किंवा त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून दिसल्यास ते हसून टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात. बाबांनी गजर्याचा सुगंध घेतल्यावर असाच आनंद व्यक्त केला. ते पाहून त्यांना सूक्ष्मातूनच ‘तो गजरा दैवी असल्याचे समजले’, हे माझ्या लक्षात आले.
२ इ. गजरा २ दिवस न सुकणे आणि त्यातून ४ दिवस सुगंध येणे : तो गजरा देवीस्वरूपिणी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी घातलेला असल्याने मी तो देवघरात ठेवला. तेव्हा २ दिवस गजरा सुकला नाही. दोन दिवसांनी गजरा थोडाफार सुकला; पण त्यातील सुगंध आधीप्रमाणेच येत होता. तेव्हा गजरा आणि त्याचा सुगंध यांच्या माध्यमातून भगवंत घरी आल्याची प्रचीती आम्हा सर्वांना आली.
३. नवरात्रीच्या कालावधीत साडी नेसतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे अस्तित्व जाणवणे : नवरात्रीच्या कालावधीत मी प्रतिदिन साडी नेसत होते. साडी नेसतांना मला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे अस्तित्व सभोवती जाणवत असे. मी साडीच्या निर्या करत असतांना ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ मला नामजपाची आठवण करून देत आहेत’, असे ऐकू येत असे आणि त्यानंतर बराच वेळ माझा नामजप शांतपणे होत असे.
४. दसर्याच्या दिवशी घरातील गुरुपादुकांवर वाहिलेली शेवंतीची फुले दिवाळीपर्यंत टवटवीत असणे : विजयादशमीच्या (दसरा) दिवशी मी घरी असलेल्या गुरुपादुकांवर शेवंतीची २ फुले वाहिली होती. ती दिवाळीपर्यंत टवटवीत राहिली होती. ती फुले हलकी झाली होती. (ती वार्याने उडून जाऊ शकली असती.) तेव्हा ‘गुरुदेव साक्षात् तेथे आहेतच. त्यांचे निर्गुण तत्त्व त्या माध्यमातून घरात सतत कार्यरत आहे’, याची प्रचीती आली.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना ! : हे गुरुदेवा, या नवरात्रीत तुम्ही मला सेवा देऊन श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या माध्यमातून देवीच्या सगुण-निर्गुण तत्त्वाची शक्ती, चैतन्य आणि आनंद या स्वरूपात जे अवर्णनीय दिले, त्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता ! नवरात्रीत माझ्यावर झालेल्या दैवी कृपेमुळे माझा त्रास हळूहळू उणावला. मी आजतागायत ती कृपा अनुभवत आहे. त्यामुळे त्या वेळचा उत्साह अजूनही टिकून आहे. ही केवळ तुमचीच कृपा ! खरेतर ही कृपा अखंड होत असते; परंतु मला असलेला आध्यात्मिक त्रास आणि माझ्यातील स्वभावदोष अन् अहं यांच्या प्रभावामुळे ही कृपा सातत्याने अनुभवण्यास मी न्यून पडते. ‘या वेळी नवरात्रीच्या कालावधीतील यज्ञयागाच्या माध्यमातून तुम्ही मला जे चैतन्य दिले, ते माझ्यात अखंडपणे कार्यरत राहो आणि या जिवाकडून तुमचे अखंड स्मरण अन् सेवा घडो’, ही आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.) आरती तिवारी, नागेशी, गोवा. (१९.११.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |