वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला आमचा विरोधच ! – सकल हिंदु समाज
रत्नागिरी वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी हिंदु संघटनांनी काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा केला निषेध !
रत्नागिरी – येथील वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी सकल हिंदु समाज आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी या उद्घाटनाचा निषेध करत काळे झेंडे दाखवले. सकल हिंदु समाजाने या कार्यालयाला विरोध असल्याचे स्पष्ट करत निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले होते. या कार्यालयाला भाजपनेही तीव्र विरोध केला होता. त्यामुळे पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हा कार्यक्रम पार पाडावा लागला. या वेळी आंदोलकांनी मंत्री उदय सामंत यांनाही काळे झेंडे दाखवत वक्फ बोर्डाचे कार्यालय रद्द करावे, अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र हिंदुत्वनिष्ठ स्वत:च्या आंदोलनावर ठाम राहिले. (असे करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ! – संपादक)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुसलमान समाजासाठी कुवारबाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये वक्फ बोर्ड कार्यालय होत आहे. याच कार्यालयाचे ७ ऑक्टोबरला उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाला विरोध करण्यात आला. या आंदोलनाच्या वेळी चंद्रकांत राऊळ, राकेश नलावडे, नंदकिशोर चव्हाण, अक्षय चाळके, राम चव्हाण यांच्यासह शेकडो हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
या वेळी सकल हिंदु समाजाच्या वतीने चंद्रकांत राऊळ म्हणाले की,
१. वक्फ बोर्डाने भारतमाता आणि हिंदु समाज यांच्या भूमी कह्यात घेतल्या आहेत. हे वक्फ बोर्ड विधेयक ८ मार्च २०२४ ला प्रलंबित असतांनाही रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत शहरामध्ये वक्फ बोर्डाचं कार्यालय आणण्याला आम्हा हिंदु समाजाचा तीव्र विरोध आहे.
२. आम्हाला याविषयी निषेध करण्याचा अधिकार आहे. तो आम्ही बजावत आहोत.
३. वक्फ बोर्डाच्या अटी जाचक असतांना हा बोर्ड येथे कशाला ? आम्हा हिंदूंच्या भूमी तुमच्या कह्यात घ्यायच्यात का ? असा आमचा प्रशासनाला प्रश्न आहे. यासाठी सकल हिंदु समाज यापुढेही तीव्र आंदोलन करील.
४. महाराष्ट्रात केवळ ५ ते ६ ठिकाणी या कार्यालयाची मागणी झालेली असतांना आणि येथे त्यांची (मुसलमानांची) लोकसंख्या न्यून असतांना येथे कार्यालय कशाला ?आमच्यावर हा अन्याय का केला जात आहे? पोलीस प्रशासनाला आज आम्ही साहाय्य करतो; पण नेहमीच आम्हाला अन्यायकारक वागणूक मिळाली, तर त्यांचाही आम्ही निषेधच करू. याच्याही पुढे आम्ही आंदोलन करून हे वक्फ बोर्ड हटवणारच !
५. पालकमंत्री, पोलीस आणि प्रशासन यांना यासंदर्भात निवेदन दिलेले आहे; मात्र अनुभव असा आहे की, राज्यघटनेनुसारच आम्ही आंदोलन करत असतांना आम्हाला पोलिसांचा विरोध होतो.
६. आज संभाजीनगरचे कार्यालय येथील जिल्हाधिकारी प्रशासनाला पत्र देऊन वक्फ बोर्डच्या कार्यालयासाठी जागा मागते. तेथे विरोध करूनही हे कार्यालय पुन्हा येथील शासकीय जागेत येतेय आणि आता हा जर शासकीय कार्यक्रम असेल, तर प्रशासन हिंदु मुसलमान भेद कशाला करतेय ? पालकमंत्र्यांचे आम्हाला निमंत्रण असेल, तर प्रशासन आम्हाला का अडवतेय ?
७. आम्हाला हे राष्ट्र वाचवायच म्हणूनच आमचे हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे. आता यापुढे हिंदु समाज अन्याय सहन करून घेणार नाही. वक्फ बोर्डाचा विषय गावागावांत पोचवून हिंदूंचे प्रबोधन करणार!
सकल हिंदु समाज पत्रकार परिषदेतील सूत्रे
१. केंद्र सरकाराने वक्फ बोर्डाच्या संदर्भात घटना दुरुस्तीसाठी भारतीय नागरिकांकडून लेखी सूचना मागवल्या होत्या. हे विधेयक संसदेत प्रलंबित आहे, असे असतांना रत्नागिरीमध्ये वक्फ बोर्डाचे कार्यालय कशासाठी होत आहे.
२. शिरगाव (ता. रत्नागिरी), पन्हळे (ता. राजापूर) आणि रत्नागिरीतील टिळक ग्रंथालयासह अन्य ठिकाणी अनधिकृत धर्मस्थळे बांधली जात आहेत. याची तक्रारही जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
३. आमची भूमी कह्यात घेऊन भारताला इस्लामिक देश बनवण्याचा वक्फ बोर्डाचा हेतू दिसतो.
४. आमचा कुठल्या धर्माला किंवा पंथाला विरोध नाही. आम्ही राजकीय पक्षाचेही समर्थन करत नाही; परंतु हिंदूंचे हित जो जपेल त्यालाच आम्ही साहाय्य आणि मतदान करणार आहोत.
वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला भाजपचा तीव्र विरोध
आज जरी कार्यालय चालू केले, तरी भविष्यात ते बंद झालेले असेल ! – राजेश सावंत जिल्हा अध्यक्ष भाजप
रत्नागिरी – भारतीय जनता पक्षाचा वक्फ बोर्डाला विरोध आहे . या बोर्डाच्या संदर्भात पूर्ण देशातील नागरिकांचे म्हणणं केंद्रशासनान मागवलेले आहे. त्यामुळे देशाचे गृहमंत्री या संदर्भातील लोकांच्या ज्या भावना आहेत, या भावनांचा विचार करून वक्फ बोर्डाविषयी निर्णय घेतला जाणार आहे. असा निर्णय घेेण्याच्या अगोदर हे वक्फ बोर्डाचे कार्यालय रत्नागिरीमध्ये चालू करणे याला आमचा विरोध आहे. आज जरी या कार्यालयाचे उद्घाटन झाले, तरी जेव्हा वक्फ बोर्डाविषयी नियमावली येईल, तेव्हा हे कार्यालय बंद झालेले असेल. अशा वादग्रस्त कार्यालयाचे उद्घाटन करणे, हेच चुकीचे आहे.