Modi On Maldives : आम्ही मालदीवमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सिद्ध आहोत ! – पंतप्रधान मोदी
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांच्यात नवी देहलीतील हैदराबाद हाऊसमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन प्रसारित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य यांच्या विविध पैलूंवर तपशीलवार चर्चा केली. विकास हा आमच्या संबंधांचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि आम्ही नेहमीच मालदीवच्या लोकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. आम्ही मालदीवमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सिद्ध आहोत. मालदीवच्या लोकांची जीवनावश्यक वस्तूंची मागणी पूर्ण करणे असो, नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिण्याचे पाणी पुरवणे असो किंवा कोविडच्या काळात लस पुरवणे असो, आपला शेजारी म्हणून भारताने नेहमीच स्वतःचे दायित्व पार पाडले आहे.
मुइज्जू यांचे मोदी यांना मालदीव दौर्याचे आमंत्रण
मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदी यांना मालदीव दौर्याचे आमंत्रण दिले आहे. ते म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी यांना मालदीव भेटीसाठी आमंत्रित करू इच्छितो. मालदीवच्या गरजेच्या वेळी भारत त्याच्या पाठीशी उभा राहिला आहे. मालदीवला दिलेल्या साहाय्यासाठी मी पंतप्रधान मोदी आणि भारत सरकार यांचे आभार मानतो.
भारतीय पर्यटकांना परतण्याचे मुइज्जू यांचे आवाहन !
भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये परत येण्याचे आवाहन करतांना मुइज्जू म्हणाले की, शेजारी आणि मित्र यांचा आदर हे मालदीवसाठी भारतियांचे सकारात्मक योगदान आहे. भारतीय पर्यटकांचे आमच्या देशात स्वागत आहे. मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध नेहमीच भक्कम राहिले आहेत अन् मला विश्वास आहे की, या भेटीमुळे ते आणखी भक्कम होतील.