RG’Kar Doctors N Staff ExpelledForRagging : आर्.जी. कर महाविद्यालयातील डॉक्‍टर, प्रशिक्षार्थी आणि कर्मचारी असे १० जण बडतर्फ !

लैंगिक गैरवर्तन, हिंसाचार आणि बलपूर्वक पैसे गोळा केल्‍यावरून हकालपट्टी !

कोलकाता (बंगाल) – राधा गोविंद कर (आर्.जी. कर) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्‍णालय हे गेल्‍या २ महिन्‍यांपासून एका ३१ वर्षीय पदव्‍युत्तर महिला प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरवरील पाशवी बलात्‍कर आणि त्‍यानंतर तिची निर्घृण हत्‍या केल्‍यामुळे चर्चेत आहे. आता हे रुग्‍णालय पुन्‍हा चर्चेत आले आहे; करण त्‍याने डॉक्‍टर, इंटर्न (प्रशिक्षणार्थी) आणि हाऊस स्‍टाफ (कर्मचारी) यांसह १० लोकांना बडतर्फ केले आहे. त्‍यांच्‍यावर लैंगिक गैरवर्तन, हिंसाचार, ‘धमकी संस्‍कृती’ला प्रोत्‍साहन देणे, तसेच बळजोरीने पैसे गोळा केल्‍याचे आरोप आहेत.

१. अहवालानुसार बडतर्फ करण्‍यात आलेले लोक माजी प्राचार्य संदीप घोष यांचे निकटवर्तीय आहेत.

२. बडतर्फ व्‍यक्‍ती इतरांना परीक्षेत अनुत्तीर्ण करण्‍याची किंवा त्‍यांना वसतीगृहातून काढून टाकण्‍याची धमकी देत होते. यासह ते काही कनिष्‍ठ विद्यार्थ्‍यांना एका विशिष्‍ट राजकीय पक्षात सहभागी होण्‍यास भाग पाडत होते. एवढेच नाही, तर तक्रारी प्रविष्‍ट (दाखल) करून विद्यार्थ्‍यांच्‍या विरुद्ध खोटे गुन्‍हे नोंद केले जात होते. यामध्‍ये अगदी शारीरिक हिंसेचाही समावेश होता.

३. बडतर्फ व्‍यक्‍तींवर कनिष्‍ठांना रात्री उशिरा अमली पदार्थ आणि मद्य खरेदी करण्‍यास भाग पाडण्‍याचा अन् मुलांच्‍या ‘कॉमन रूम’मध्‍ये अश्‍लील कृत्‍ये करण्‍यास भाग पाडल्‍याचा आरोप आहे.

४. यांपैकी ज्‍यांच्‍यावर महिलांविरुद्ध लैंगिक छळाचे ठोस पुरावे असल्‍याचे आढळले आहे, त्‍यांना पुढील तपास आणि करवाई यांसाठी अंतर्गत तक्रार समितीकडे पाठवण्‍यात आले आहे.

५. बडतर्फ करण्‍यात आलेल्‍यांमध्‍ये आशिष पांडे हा डॉ. संदीप घोष यांच्‍या जवळचा हाऊस स्‍टाफचा सदस्‍य आहे. याला केंद्रीय अन्‍वेषण विभागाने आर्थिक अनियमितता आणि भ्रष्‍टाचार यांप्रकरणी अटक केली होती.

संपादकीय भूमिका

अनाचाराचा अड्डा बनलेले आर्.जी. कर महाविद्यालय ! तेथील महिला डॉक्‍टरवर बलात्‍कर करून हत्‍या केल्‍याचे प्रकरण समोर आले नसते, तर तेथील गैरप्रकर समोर आले नसते !