‘पी.एम्.आर्.डी.ए.’च्या भ्रष्ट अधिकार्‍यांनी मला अपकीर्त करण्याचा कट रचला !

चैतन्य महाराज वाडेकरांचा पुणे येथील पत्रकार परिषदेत आरोप

पुणे – अवैध जमाव जमवून जेसीबी, पोकलँड यंत्राच्या साहाय्याने आस्थापनाच्या रस्त्यावर खड्डे पाडल्याच्या प्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांच्यासह अनोळखी १० ते १५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. मी प्रसिद्ध कीर्तनकार असल्याने मला अपकीर्त करण्याचा हा संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा कट असल्याचा आरोप चैतन्य महाराज वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. चैतन्य महाराज वाडेकर यांच्यासह त्यांचे २ भाऊ अधिवक्ता अमोल, प्रमोद वाडेकर आणि नातेवाईक यांना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चैतन्य वाडेकर यांनी त्यांची बाजू पुण्यातील पत्रकार भवन येथे मांडली. त्या वेळी त्यांनी ‘पी.एम्.आर्.डी.ए.’च्या भ्रष्ट अधिकार्‍यांचा बांधकाम व्यावसायिकाला पाठिंबा असून संबंधित व्यावसायिकाकडून त्यांच्या जागेत अतिक्रमण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एका आस्थापनाचा रस्ता उकरल्यामुळे अटक झाल्याच्या अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या प्रसारित झाल्या आहेत; मात्र यातून संबंधित व्यावसायिकाकडून माझे नाव खराब करण्याचा हेतू असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

चैतन्य महाराज वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली सूत्रे 

१. आमच्याकडे जागेच्या मालकीचे पुरावे असूनही आम्हाला आमच्या जागेत जाण्यासाठी या व्यावसायिकांनी प्रतिबंध केला होता. माझे भाऊ प्रमोद वाडेकर यांनी आमची असलेली मोकळी जागा, ज्या जागेचा वापर अनधिकृतपणे सदर बांधकाम व्यवसायिक जाण्या-येण्यासाठी करत आहेत. त्या जागेचा कोणालाही वापर करून न देण्याचा निर्णय घेतला.  त्याप्रमाणे त्या ठिकाणी माझा भाऊ आमच्या जागेचे नियोजन करत होता. तिथे कोणतेही गुंड उपस्थित नव्हते आणि मी माझ्या घरातच बसून होतो.

२. दुसर्‍या दिवशी सदर बांधकाम व्यवसायिकांनी म्हाळुंगे एम्आयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलीस माझा मोठा भाऊ प्रमोद यांना घेऊन गेले आणि त्या ठिकाणाचा ताबा पोलिसांच्या उपस्थितीत आमच्याकडून काढून घेऊन सदर बांधकाम व्यवसायिकांना देत असतांना आमचा अपंग भाऊ अधिवक्ता अमोल वाडेकर यांनी त्यांना थांबवल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही पोलीस ठाण्यात येण्याची विनंती केली. माझ्या भावासह मी पोलीस ठाण्यात गेलो असता पोलिसांकडून आमच्या तिघांवर आमच्याच वडिलोपार्जित मालकी आणि ताबेवहिवाटीच्या जागेतून बांधकाम व्यावसायिकाचा रस्ता अडवल्याच्या कारणावरून गुन्हा नोंद केला. आम्हाला जामिनावर सोडण्यात आले. सदर प्रकरणी जरी गुन्हा नोंद झाला असला, तरी मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो.

३. हा बांधकाम व्यावसायिक खेड तालुक्यातील, तसेच पुणे जिल्ह्यातील एक कुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक असून सर्वांनाच त्याच्या चुकीच्या कामांची प्रचिती आहे.