जातीने नव्हे, तर गुणांनी व्यक्ती मोठी ठरते ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण !
सांगली, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – मी जातीवाद करत नाही आणि मानतही नाही. माझे ते गुण मला लोकसभा निवडणुकीत अडचणीचे ठरले नाहीत. मी निवडून आलो. कोणतीही व्यक्ती ही जात, पंथ, धर्म, भाषा आणि लिंग यांनी श्रेष्ठ, मोठी ठरत नाही. ती गुणांनी मोठी ठरते. गुण, कर्तव्यावर विश्वास ठेवून काम करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. येथील ‘मराठा समाज सांगली संस्थे’च्या अमृत महोत्सवानिमित्त उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि सभागृह नूतनीकरण कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते अन् खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्या वेळी ते बोलत होते. हिंदवी स्वराज्यासाठी योगदान दिलेल्या पराक्रमी सरदारांच्या वंशजांचा सत्कार शरद पवार यांनी केला.
गडकरी म्हणाले की, राजकारणात जात, पैसा, गुन्हेगार वरचढ होत आहेत. राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी शिवरायांच्या कर्तृत्वाचे, गुणवत्तेचे, प्रशासकीय कौशल्याचे अनुकरण करावे.