सनातन संस्थेचे सद्गुरु आणि संत यांचे आज्ञापालन केल्यावर साधिकेची कुटुंबियांच्या संदर्भातील काळजी नष्ट होणे
१. नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करू लागल्यावर कुटुंबियांची वाटणारी काळजी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या मार्गदर्शनामुळे उणावणे
‘मी नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करू लागल्यावर आरंभी काही दिवस माझ्या मनात ‘मी पूर्णवेळ होऊन चूक केली का ? आई-वडिलांचे कसे होईल ? बहीण-भाऊ अजून शिकत आहेत. मी नोकरी सोडण्याची घाई केली का ?’, असे विचार येऊन मला कुटुंबियांची काळजी वाटायची. त्या वेळी सनातन संस्थेच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर (वय ५१ वर्षे) यांनी मला सांगितले, ‘‘आपण लाखो रुपये कमावले, तरी कुटुंबियांचे प्रारब्ध पालटू शकणार नाही. जे त्रास आहेत, ते प्रत्येकाला भोगावेच लागतात. त्यापेक्षा कुटुंबाला गुरुदेवांच्या चरणी अर्पण कर. तू अखंड गुरुसेवेत रहा. तेच त्यांची काळजी घेतील.’’ तेव्हापासून जेव्हा मला कुटुंबियांची काळजी वाटे, तेव्हा मी सद्गुरु अनुराधाताई यांनी सांगितल्याप्रमाणे कुटुंबियांना गुरुचरणांवर समर्पित करू लागले. त्यानंतर हळूहळू त्यांच्याविषयीचे काळजीचे विचार पुष्कळ उणावले.
२. आई रुग्णाईत असतांना घरी न गेल्याने नातेवाइक साधिकेला रागावणे
वर्ष २०१९ मध्ये मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून दादर (मुंबई) येथील सेवाकेंद्रात आले आणि तिकडेच राहिले. त्या कालावधीत माझी आई रुग्णाईत होती. आधुनिक वैद्यांनी तिला एक शस्त्रकर्म करायला सांगितले होते; पण काही अडचणींमुळे ते करण्याची तिची सिद्धता होत नव्हती. तेव्हा माझे नातेवाइक मला संपर्क करून आईसाठी घरी येण्यास सांगत होते आणि मी घरी जात नसल्याने ते मला रागवतही होते.
३. आईविषयी भावनाशील होत असल्याने सद्गुरु अनुताई यांनी साधिकेला आश्वस्त करणे
मला आईची काळजी वाटत होती; पण माझ्या साधनेला कुटुंबीय आणि नातेवाइक यांचा विरोध असल्याने ‘मी घरी गेले, तर ते मला पुन्हा आश्रमात पाठवणार का ?’, अशी भीती माझ्या मनात होती. घरी आईची काळजी घ्यायला कुटुंबीय होते. त्यामुळे प्रत्यक्षात माझी तेथे आवश्यकता नव्हती; परंतु माझे मन आईविषयी पुष्कळ भावनीशील होत असल्याने मी त्याविषयी सद्गुरु अनुराधाताई यांना सांगितले. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘काळजी करू नकोस. देव आईची काळजी घेईल.’’
४. पू. (सौ.) संगीता जाधव यांचेही साधिकेच्या आईप्रमाणेच शस्त्रकर्म झाल्याने त्यांच्या सेवेची संधी मिळाल्यावर देवाप्रती कृतज्ञता वाटणे
अ. आईच्या शस्त्रकर्माच्या प्रसंगानंतर काही दिवसांनी पू. (सौ.) संगीता जाधवकाकूंचे (सनातन संस्थेच्या ७४ व्या संत, वय ५५ वर्षे) माझ्या आईचे ज्या व्याधीविषयी शस्त्रकर्म होणार होते, त्याच व्याधीविषयीचे शस्त्रकर्म झाले. तेव्हा मला वाटले, ‘आईचा त्रास देवाने स्वतःकडे घेतला. घरी जाऊन आईची करावी लागणारी सेवा आता इथे राहून पू. काकूंची करायची. अशा प्रकारे नियोजन करून देवाने माझ्यावर पुष्कळ उपकार केलेत.’
आ. मला पू. जाधवकाकूंच्या सेवेची संधी मिळाली. तेव्हा मला वाटायचे, ‘घरी राहून जे केले असते, तेच देव इथे करून घेत आहे. देव मला दुहेरी फळ देत आहे. एक म्हणजे आईची काळजी देव घेत आहे आणि दुसरे म्हणजे संतसेवेच्या मध्यमातून आईची सेवा केल्याचा आनंद अन् समाधानही देत आहे.’
५. पू. जाधवकाकूंच्या मार्गदर्शनामुळे साधनेत होणार्या मनाच्या संघर्षाला तोंड देण्यासाठी बळ मिळणे
दादरला असतांना काही दिवस मी ‘ठाणे जिल्ह्यातील साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा कसा घ्यायचा ?’, हे शिकत होते. त्या वेळी आढाव्यात एका साधकाने एक प्रसंग सांगितला. तेव्हा ‘त्या प्रसंगात काय दृष्टीकोन असावा ?’, हे मला सांगता आले नाही. मी पू. जाधवकाकूंना तो प्रसंग सांगितला. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘आपण मायेत असलो किंवा साधनेत असलो, म्हणजेच कुठेही असलो, तरी संघर्ष करावाच लागतो. मायेत संघर्ष केला, तर देवाण-घेवाण वाढेल आणि साधनेत संघर्ष केला, तर प्रगती होईल !’’
त्या वेळी मी ‘त्यांचे हे वाक्य माझ्यासाठी कधी लागू पडेल ?’, असा विचारही केला नव्हता; कारण मला वाटत होते, ‘मी आश्रमात आहे. माझ्या घरचे माझ्या संपर्कात नाहीत. त्यामुळे माझ्यावर मायेतील संघर्ष करण्याची वेळ येणारच नाही’; परंतु त्यानंतर अनेक वेळा पू. जाधवकाकूंच्या या वाक्याने मला साधनेत संघर्ष करण्यासाठी बळ दिले.
६. मनाचा संघर्ष होतांना पू. जाधवकाकूंच्या मार्गदर्शनातून प्रेरणा मिळून साधिकेचा साधनाच करण्याचा निश्चय दृढ होऊ लागणे
माझ्याकडून सेवा करतांना अनेक चुका हाेत होत्या. मला काही साधकांशी जुळवून घेणे जमत नव्हते. माझ्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्नही अपेक्षित असे होत नव्हते. मला सेवेच्या नियोजनाच्या सेवा आवडत नव्हत्या आणि मला त्याच सेवा मिळायच्या. चूक झाली की, गळ्यात माझ्यातील स्वभावदोषांविषयीची पाटी (टीप) घालण्याची किंवा संतसेवा न करण्याची शिक्षा मिळायची, तसेच मी सतत रुग्णाईत असायचे. त्या वेळी माझ्या मनाचा संघर्ष व्हायचा आणि ‘मला साधना जमणार नाही. आपण घरी जाऊ. घरी राहून साधना करू’, असे विचार माझ्या मनात यायचे. तेव्हा मला आठवायचे, ‘घरी राहून साधना करतांना कुटुंबियांना आवडत नसल्याने त्यांच्याशीही जुळवून घेता येत नव्हते. घरी किंवा नोकरीच्या ठिकाणी कामात चुका झाल्या, तर ओरडा पडायचा. तेव्हाही संघर्ष होतच होता.’ त्या वेळीही पू. जाधवकाकूंनी केलेल्या मार्गदर्शनातून मला दिशा मिळायची आणि ‘साधनेत राहूनच संघर्ष करायचा’, असा निश्चय व्हायचा अन् प्रसंगातून लगेच बाहेर पडता यायचे.
टीप – स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवतांना साधकांचे तीव्र स्वभावदोष सर्वांना कळून त्यांसंदर्भात सहसाधकांचे साहाय्य मिळावे आणि स्वतःलाही प्रकर्षाने त्या स्वभावदोषांची जाणीव व्हावी, यासाठी गळ्यात तीव्रता असलेले स्वभावदोष लिहिलेली पाटी घालण्यास सांगण्यात येते.
७. सेवा मनापासून आणि दायित्वाने करण्याची जाणीव सद्गुरु अनुराधाताई यांनी करून दिल्यावर तशा अनुभूती येणे
काही वर्षांपूर्वी दादर येथील सर्व साधक ठाणे सेवाकेंद्रात स्थलांतरित झाले. तेव्हा दादर येथे साधक संख्या अल्प असल्याने माझ्याकडे काही दायित्वाच्या सेवा आल्या; पण मी त्या सेवा मनापासून आणि दायित्वाने करत नव्हते. त्या वेळी सद्गुरु अनुराधाताई यांनी मला सांगितले, ‘‘आपण देवाच्या सेवांचे दायित्व घेतले, तर देवही आपले दायित्व घेतो.’’ त्यानंतर त्यांच्या या शिकवणीची मला अनेक प्रसंगांत अनुभूती आली.
८. कोरोना काळात कुटुंबियांविषयी मन भावनिक झाल्यावर सद्गुरु अनुराधाताई यांच्या शिकवणीप्रमाणे भाव ठेवून सेवा करणे
कोरोना महामारीच्या काळात माझ्याकडे रुग्णाईत साधकांना उपाय (आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी दिलेले नामजपादी उपाय) देण्याच्या समन्वयाची सेवा होती. तेव्हा माझ्या मनात यायचे, ‘साधक आहेत; म्हणून ते दिलेले नामजपादी उपाय भाव ठेवून करतात, तसेच साधकांसाठी आध्यात्मिक पातळी ६० टक्के आणि त्याहून अधिक असलेले साधक अन् संत नामजपादी उपाय करत आहेत. त्यामुळे रुग्णाईत साधक बरे होत आहेत.’ त्या वेळी ‘माझे कुटुंबीय कसे असतील ? त्यांना मी आश्रमात राहिलेलेही आवडत नाही. त्यांच्यापैकी कोणी रुग्णाईत झाल्यावर त्यांना नामजपादी उपाय करण्यास सांगितले, तर ते करतील का ? ते रुग्णाईत झाल्यावर मी काय करू ?’ इत्यादी विचारांनी माझे मन भावनिक व्हायचे. त्या वेळी सद्गुरु अनुराधाताई यांची ‘मी सेवांचे दायित्व घेतले की, देव माझे दायित्व घेईल’, ही शिकवण आठवून माझे मन निश्चिंत व्हायचे. ‘साधक हेच माझे कुटुंब आहे. ‘त्यांना वेळेत उपाय कळवणे’, हे माझे दायित्व आहे’, याची जाणीव होऊन माझ्याकडून सेवा होत होती.
९. ‘देव कुटुंबियांचे पूर्ण दायित्व घेऊन सांभाळ करत आहे’, हे अनुभवणे
त्या काळात ‘माझ्या कुटुंबातील कोणी रुग्णाईत आहेत’, असे झाले नाही. त्या वेळी ‘देव त्यांचे पूर्ण दायित्व घेऊन सांभाळ करत आहे’, हे मला अनुभवता आले. प्रत्यक्षात आमचे घर चाळीत असल्याने ‘कोरोना काळात तेथे आवश्यक तेवढी काळजी घेतील’, असे वातावरण नव्हते. असे असूनही देवाने त्या काळात माझ्या कुटुंबाचे रक्षण केले.
‘सद्गुरु अनुराधाताई आणि पू. जाधवकाकू, आपल्या कृपेमुळे मला साधना करण्यासाठी बळ मिळाले. आपल्या दोघींच्या रूपात गुरुसेवेची संधी मिळाली, यासाठी आपल्या दोघींच्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी मी कृतज्ञ आहे.’
– सौ. रेणुका मिलिंद तावडे (पूर्वाश्रमीच्या कु. रेणुका वळंजु), विरार, जिल्हा पालघर. (८.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |