चित्पावन संघाच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त १० ऑक्टोबरला श्री महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळा !
कोल्हापूर – हिरक महोत्सवी कोल्हापूर चित्पावन संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त चित्पावनी कुळाचारा प्रमाणे ‘श्री महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा १० ऑक्टोबरला सकाळी ९ ते रात्री १० या कालावधीत बिनखांबी गणेश मंदिराजवळ ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम) येथे होणार आहे. या सोहळ्यात महापूजा, श्रींची कहाणी वाचन, आरती, महानैवेद्य, श्री देवीमूर्ती प्रतिष्ठापना यांसह घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७.३० नंतर महालक्ष्मीचे दर्शन भाविकांसाठी खुले होणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष मकरंद करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी उपाध्यक्ष प्रसाद भिडे, कार्यवाह केदार जोशी, संतोष साने, नंदकुमार मराठे, निखिल गोखले यांसह संगीता आपटे, सीमा गोखले, पल्लवी देशमुख उपस्थित होत्या.
मकरंद करंदीकर पुढे म्हणाले, ‘‘चित्पावन संघाच्या अष्टमी जागर सोहळ्यातील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तांदळाच्या उकडीपासून सिद्ध केलेला आदिशक्तीचा मुखवटा. जागरा दिवशी सायंकाळी समाजातील ज्येष्ठ मंडळी गुरुजींच्या उपस्थितीत तांदळाच्या पिठाची उकड करतात. उकडीच्या गोळ्यावर देवीचा तोंडावळा करून मुखवटा केला जातो. हा मुखवटा बघणार्या भक्ताला अगदी हुबेहूब साक्षात देवीच आपल्यासमोर उभी असल्याचे जाणवते.’’
कार्यक्रमाचे स्वरूप
सकाळी ९ वाजता – स्वागत पूजा साहित्य वाटप, सकाळी १० वाजता – तुलसी पूजन पूजेचा आरंभ संकल्प, सकाळी ११ वाजता- आरती कहाणी वाचन आणि महानैवेद्य, दुपारी १२ वाजता – महाप्रसाद वाटप, रात्री ७ वाजता – श्रींची मूर्ती उभी करणे, रात्री ७. ३० वाजता – घागरी फुंकण्याचा कार्यक्रम !
चित्पावन संघाची माहिती – मूळचे कोकण प्रांतातील मात्र नोकरी-व्यवसाय निमित्त महाराष्ट्रभर पसरलेला समाज अशी चित्पावन बांधवांची ओळख आहे. चित्पावनांच्या कित्येक पिढ्या कोल्हापुरात वास्तव्यास आहेत. वर्ष १९६४ मध्ये समाजातील ज्ञाती बांधवांनी एकत्र येऊन कोल्हापूर चित्पावन संघाची स्थापना केली. संघाच्या माध्यमातून प्रतिवर्षी रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, धुंदुरमास, वीर सैनिकांसाठी मदत, सार्वजनिक बोडण सोहळा, समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ असे धार्मिक सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवले जातात. संघाच्या वतीने श्रीसूक्त, विष्णुसहस्रनाम शिकवण्यात येते, तसेच योगासन वर्गही घेण्यात येतात. |
कोल्हापूर चित्पावन संघाच्या वतीने घरपोच अभिषेक प्रसाद पाठवण्यात येतो. त्यासाठी ३५१ रुपये देणगी शुल्क आकारण्यात येते. हा प्रसाद अष्टमीच्या दिवशीच भारतभरातून ज्यांची कुणाची मागणी असेल, त्यांना तात्काळ कुरिअरने पाठवण्यात येतो, जेणेकरून नवरात्र संपायच्या आत त्यांना हा प्रसाद मिळू शकेल.