पुन्हा एकदा सावरकर : काँग्रेसची मतमतांतरे !
‘सावरकर चित्पावन ब्राह्मण असले, तरी ते गोमांस खायचे’, या काँग्रेस नेत्याच्या विधानावर सडेतोड खंडण !
३ ऑक्टोबरला कर्नाटकचे आरोग्यमंत्री तथा काँग्रेस नेते दिनेश गुंडुराव यांनी असे विधान केले, ‘सावरकर चित्पावन ब्राह्मण असले, तरी ते गोमांस खायचे आणि त्यांनी गोमांस खाण्याचा प्रचार केला होता. सावरकरांनी कधीच गोहत्येचा विरोध केला नाही. याविषयी त्यांचे विचार अत्यंत पुढारलेले (आधुनिक) होते.’’
१. दिनेश गुंडुराव यांनी केलेले विधान धादांत खोटे !
सावरकर मासे, कोळंबी, अंडी, चिकन अशा प्रकारचा मांसाहार करायचे, हे खरे आहे आणि त्यांनी हे कधीही नाकारलेले नाही अन् त्यांनी ते लपवूनही ठेवलेले नाही. असे असले, तरी सावरकरांनी कधीही गोमांस खाल्ले नाही आणि ते खाण्याचा आग्रह धरला नाही किंवा प्रचार-प्रसारही केलेला नाही. सावरकर यांनी गोहत्या, गोरक्षण यांवर काही लेख लिहिले आहेत. ते ‘समग्र सावरकर वाड्मय’ आणि ‘क्ष किरणे’ या पुस्तकांमध्ये उपलब्ध आहेत; पण यातील एकाही लेखात ‘त्यांनी स्वतः गोमांस खाल्ल्याचा उल्लेख केलेला नाही किंवा गोमांस खाण्याचा प्रचार-प्रसार केलेला नाही. त्यांचे आत्मचरित्र, समग्र सावरकर खंड, त्यांच्यावरील चरित्रे, समकालीन व्यक्ती आणि सहकार्यांच्या आठवणी, त्यांची पत्रे, त्यांच्यावरील ब्रिटिशांच्या नोंदी, गुप्त कागदपत्रे यांतही सावरकर यांनी ‘स्वतः गोमांस खाल्ल्याचा उल्लेख नाही किंवा गोमांस खाण्याचा प्रचार-प्रसार केलेला नाही.’ त्यामुळे ‘सावरकर गोमांस खायचे आणि त्यांनी गोमांस खाण्याचा प्रचार केला होता’, हे दिनेश गुंडुराव यांचे विधान धादांत खोटे आहे.
२. …हा आधुनिक असण्याचा पात्रता निकष आहे का ?
पुढे ते असेही म्हणाले, ‘सावरकरांनी कधीच गोहत्येचा विरोध केला नाही. याविषयी त्यांचे विचार अत्यंत पुढारलेले (आधुनिक) होते’, म्हणजे ‘गोहत्या करणे किंवा त्याचा विरोध न करणे, हा आधुनिक असण्याचा पात्रता निकष किंवा फूटपट्टी आहे का ? गोहत्या न करणारे किंवा त्याचा विरोध करणारे सगळे प्रतिगामी आहेत का ?’ काय खायचे ? काय खायचे नाही ? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याचा पुढारलेले विचार असण्या-नसण्याशी काय संबंध ? म्हणजे आधुनिक आहात कि नाही ? हे सिद्ध करण्यासाठी त्या व्यक्तीला गोहत्या विरोध न करणे किंवा गोहत्या समर्थन करावे लागणार आहे का ? यावर ‘पेटा’ या प्राणीप्रेमी संस्थेची काय भूमिका असणार आहे ?
३. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गायीविषयीचे विचार
सावरकर म्हणायचे, ‘काय खायचे, प्यायचे, हा प्रश्न आरोग्याशी निगडित असल्याने हा वैद्यकशास्त्राचा प्रश्न आहे, धर्मशास्त्राचा नव्हे. माझा धर्म हृदयात आहे, पोटात नाही’; पण म्हणून सावरकर यांनी गोमांस कधीही खाल्लेले नाही. ‘गाय हा एक उपयुक्त पशू आहे’, असे सावरकर म्हणायचे; पण म्हणून त्यांनी गोहत्येचे कधीही समर्थन केलेले नाही. फक्त त्यांनी ‘गोपूजनापेक्षा गोपालन करा’, असे सांगितले होते. सावरकर यांचा गोशाळेला मुळीच विरोध नव्हता. फक्त त्यांची प्राथमिकता राष्ट्ररक्षणाला होती; कारण ‘आपले राष्ट्र जगले, त्यातील माणसे जगली, तरच गाय जगेल’, असे त्यांचे म्हणणे होते.
४. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा स्वपक्षातील नेत्यांना घरचा अहेर !
‘सावरकर हे विज्ञानवादी होते. सावरकरांबद्दलचे संकुचित विचार हे काँग्रेससमोरचे आव्हान आहे’, असे परखड मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात व्यक्त केले आहेत. पुढे ते म्हणतात, ‘माझ्या मनात वीर सावरकर यांच्याविषयी सन्मान आहे. त्यामुळेच वर्ष १९८३ मध्ये नागपूरमध्ये वीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात मी उपस्थिती दर्शवली होती. वीर सावरकर यांनी स्पृश्य-अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. मी स्वतः मागासवर्गातून येतो. त्यामुळे वीर सावरकरांनी जे प्रयत्न केले, त्याचे महत्त्व मला ठाऊक आहे. वीर सावरकरांचे ‘हिंदुत्व’ या विषयावर जोर दिला जातो; मात्र त्यांच्या व्यक्तीमत्त्वात अनेक पैलू होते, तसेच वीर सावरकर विज्ञानवादी होते.
वीर सावरकर आणि त्यांचे हिंदुत्व यांचीच चर्चा होते. वीर सावरकर यांच्यातील विज्ञानवादी दृष्टीकोन, त्यांचे तत्त्वज्ञान, सामाजिक बांधिलकी, समाजातील सगळे घटक एकत्र यावेत; म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न याकडे का पाहिले जात नाही ? वीर सावरकर यांच्याविषयी एक संकुचित विचार करणे, हे काही योग्य नाही. मी राजकारणात प्रदीर्घ काळ घालवला आहे. मला आता असे वाटते की, पक्षाने ही विचारधारा पालटली पाहिजे.’
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’, २ ऑक्टोबर २०२४)
याचाच अर्थ काँग्रेसचा सावरकर यांच्याविषयीचा दृष्टीकोन चुकीचा आहे. राजकीय सावरकर, म्हणजे त्यांचे हिंदुत्व जरी काँग्रेसला मान्य नसले, तरी सामाजिक सावरकर काँग्रेसने समजून घेणे आवश्यक आहे. राजकीय सावरकर मान्य नाहीत; म्हणून संपूर्ण सावरकरच नाकारणे किंवा त्यांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणे उचित नव्हे, असेच तर सुशीलकुमार शिंदे यांना म्हणायचे नसेल ना ?
लेखक : श्री. अक्षय जोग, सावरकर अभ्यासक आणि लेखक, पुणे.